Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पेठगाव परिसरात वाघाच्या हालचाली वाढल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. १६ सप्टेंबर २०२६ रोजी शाळेपासून काही मीटर अंतरावर वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी शाळेला लागूनच वाघाने डुकराची शिकार केली. यंदा परिसरात वाघाच्या हल्ल्यांत चार ते पाच बैल आणि गायी ठार झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
शाळेच्या आवारात लहान मुले खेळत असतात. अशा परिस्थितीत संरक्षण भिंत नसल्यामुळे वन्यप्राणी थेट शाळेच्या परिसरात शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) मंजूर करण्यात आले होते. मात्र, चार वर्षांचा कालावधी उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही.
संरक्षण भिंतीचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे आणि त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे की नाही, याबाबत प्रशासनाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती, सावली येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संरक्षण भिंतीचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून कामातील विलंबाची कारणे आणि निधीच्या उपलब्धतेबाबत अहवाल तयार करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद उमाजी किनेकर यांच्या पुढाकाराने हा प्रश्न ग्रामसभेत मांडण्यात आला. शाळा परिसराची पाहणी करणे, वनविभागाची गस्त वाढविणे आणि संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करणे, यासंदर्भात ग्रामसभेत ठराव घेण्यात आला.
संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होईपर्यंत वन विभागाने परिसरात नियमित गस्त वाढवावी, आवश्यक ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावावेत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तात्पुरत्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न गंभीर असतानाही संरक्षण भिंतीचे काम चार वर्षांपासून अपूर्ण राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता तरी संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करावे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






