संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि भाजपने खास तयारी सुरु केली आहे. यासाठी देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी आज महाराष्ट्र दौरा केला. यावरुन विरोधकांनी टीकास्त्र डागलं असले तरी देखील महायुतीच्या नेत्यांनी हे शक्तीप्रदर्शन असल्याची भूमिका मांडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार व रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मंत्री संदीपान भुसरे यांनी विरोधकांवर टीका केली. त्याचबरोबर निवडणूकींबाबत वक्तव्य केले. अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर बोलताना आमदार भुमरे म्हणाले, शक्ती प्रदर्शन वैगरे काही नाही, भाजप महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्व ठिकाणी महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे अशी भूमिका आमदार संदीपान भुमरे यांनी मांडली आहे.
लोकसभेसाठी सर्वच पक्ष शर्तीचे प्रयत्न करत असताना छत्रपती संभाजीनगर या जागेबाबत बोलताना संदीपान भुमरे म्हणाले, छ.संभाजीनगरची लोकसभेची जागा आम्हीच लढवणार यावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा जागा सोडणार नाहीत. या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. असा विश्वास रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला.