मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ (Photo Credit - X)
फिर्यादी करिश्मा नदीम खान (२६) या आपल्या पती आणि चार मुलांसह कुरेशी पॅलेस परिसरात भाड्याने राहतात. घरमालकीण शाहेदा बेगम खान या त्यांच्या घरातील बेकरीचा कचरा वारंवार करिश्मा यांच्या खोलीसमोर टाकत होत्या. यावरून त्यांच्यात आधीपासूनच वाद सुरू होते. १५ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा कचरा टाकल्याने करिश्मा यांनी जाब विचारला असता, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
वादादरम्यान घरमालकीण शाहेदा बेगम, तिचा मुलगा मोसीन खान आणि सून राणी खान यांनी करिश्मा यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शाहेदा बेगम हिने गर्भवती असलेल्या करिश्मा यांच्या पोटात जोरात लाथ मारली. या हल्ल्यामुळे करिश्मा खाली कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. वैद्यकीय तपासणीत या भीषण आघातामुळे त्यांचा गर्भपात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी पसार झाले. अटकेच्या भीतीने त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, सहाय्यक लोकअभियोक्ता राजू पहाडीया यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, “गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असून आरोपींनी एका निरागस जिवाचा जीव घेतला आहे. आरोपी अद्याप फरार असून त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा.” न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत तिघांचाही जामीन नामंजूर केला.
१. शाहेदा बेगम अनिस खान (४५) २. मोसीन खान अनिस खान (२८) ३. राणी खान मोसीन खान (२२)
भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…






