सौजन्य फोटो - AI Gemini
छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणींसोबत पैसे उडवून मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या तीन तरुणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे. संजय विनोद जाधवर, सुशांत मंगेश भालेराव आणि युवराज विष्णू चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलिसांचे विशेष पथक पाम हॉटेल परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मोपेडवरून तिघेजण ट्रिपल सीट जाताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. चौकशीदरम्यान तिघांनी समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. त्यानंतर या मोपेडबाबत धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसांच्या चौकशीत तिघांनी आपण ज्या मोपेडवरून प्रवास करत होतो, ती क्रांती चौक परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता टाऊन सेंटर परिसरातून आणखी दोन दुचाकी चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी तिन्ही आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
दुचाकी चोरीची आरोपींची पद्धतही तपासात समोर आली आहे. दुचाकीचे हँडल लॉक तोडण्यासाठी आरोपी पायाने हँडलवर जोरदार प्रहार करत होते. लॉक तुटल्यानंतर वायर डायरेक्ट करून दुचाकी सुरू केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर चोरीची दुचाकी घेऊन आरोपी पसार होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर चोरीमागील कारणही समोर आले. मैत्रिणींसोबत मौजमजा करण्यासाठी आणि त्यासाठी पैसे खर्च करण्याच्या उद्देशाने त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही वाहनचोरीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.






