२,७४० कोटींच्या नव्या पाणी योजनेला पहिल्याच पावसात गळती
मात्र नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याने कामाच्या गुणवतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्लॅबमधून झिरपणारे पाणी थेट पंपहाऊसमधील विद्युत पॅनलकडे येत असल्याने ते सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. संभाव्य तांत्रिक धोका टाळण्यासाठी २४ जूनपासून नवीन योजनेद्वारे सुरू असलेला वाढीव ४० एमएलडी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सध्या गळती दुरुस्तीचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता सूत्रानी व्यक्त केली आहे. नवीन योजनेतून वाढीव पाणी मिळू लागल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा गैप दहा दिवसांवरून आठ दिवसांपर्यंत खाली आला होता. मात्र पुरवठा ठप्प झाल्यानंतर पुन्हा जुन्याच वेळापत्रकानुसार नागरिकांना पाणी मिळणार आहे.
सामान्यतः पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होते. मात्र यंदा परिस्थिती उलट झाली आहे. मरीमाता जलकुंभातून पाणीपुरवठा होणाऱ्या किराडपुरा, बायजीपुरा, बारी कॉलनी, इंदिरानगर, पोलीस कॉलनी आदी भागांमध्ये आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता १० ते ११ दिवसांनी मिळत आहे. हनुमान टेकडी, जयविश्वभारती कॉलनी, चिकलठाणा, ज्योतीनगर, चौधरी कॉलनी, शहागंज यांसह इतर अनेक भागांतील पाणीपुरवठ्याचाही गॅप वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसात स्लॅबमधून गळती सुरू झाल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शहराच्या महत्त्वाकांक्षी पाणी योजनेतील अत्यंत महत्त्वाच्या संरचनेत अशा प्रकारची गळती निर्माण झाल्याने संबंधित कामाची गुणवत्ता आणि देखरेखीबाबत प्रशासनाने सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






