धोकादायक पर्यटन स्थळ त्यांनी बंद करण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : पुण्यातील मावळ भागातील कुंडमळा येथे लोखंडी पूल कोसळल्यामुळे पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पर्यटन स्थळांवरील पूल आणि बांधकामांच्या गुणवत्तेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामध्ये 50 हून अधिक पर्यटक हे वाहून गेले होते. तर 4 हून अधिक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील एक्शनमोडमध्ये आहेत. त्याचबरोबर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पर्यटन स्थळाबाबत मत व्यक्त केले आहे.
पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात तेथे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी. जी पर्यटनस्थळे धोकादायक असतील तेथे मागदर्शक सूचना लावण्याबरोबरच सुरक्षा बंदोबस्त ठेवून दुरुस्ती होईपर्यंत ती पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात यावीत. त्याचबरोबर प्रशासन अथवा पोलीस यंत्रणेच्या सूचनेनंतर देखील दक्षता न घेणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे जिल्ह्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आढावा घेतला. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या, “पावसाळ्यामध्ये पर्यटक काही पर्यटनस्थळावर मोठ्या संख्येने येतात. अशा ठिकाणी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. पर्यटकांची जीवित हानी होऊ नये यासाठी जी ठिकाणे धोकादायक असतील तेथे बंदोबस्त वाढवून आवश्यकता भासल्यास पर्यटकांना तात्पुरती बंदी घालण्यात यावी. यानंतरही काही पर्यटक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत नसतील तर अशा पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी” असे आदेश त्यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नागरिकांच्या जीविताच्या रक्षणाला प्राधान्य देऊन क्षेत्रनिहाय जबाबदारीचे वाटप करण्याची सूचना करुन होमगार्ड, एनसीसी आदींची मदत घेण्याचे निर्देश मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी दिले. पुढे त्या म्हणाल्या की, “सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व रस्त्यांवरील पुलांचे सर्वेक्षण करुन जुन्या पुलांची दुरुस्ती अथवा आवश्यकतेनुसार नवीन पूल उभारण्याचे काम हाती घ्यावे, पावसाळ्यात पर्यटकांची संख्या पुणे विभागात अधिक असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर केलेल्या तातडीच्या कार्यवाहीबाबत मुख्य सचिवांना माहिती दिली.