मोठी बातमी! वाल्मिक कराड फरार, CID कडून पत्नीची चौकशी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीन हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. देशमुख यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीने अनेकांची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार असून त्यांच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान त्यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे.
महाराष्ट्र पोलीस अॅक्शन मोडमध्ये; थेऊरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीवर केली कारवाई
वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या ते या प्रकरणात फरार आहेत. दरम्यान, सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचं पथक सकाळपासून ठाण मांडून बसलं आहे. त्यांनी दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी करून सोडून दिलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते, त्यानंतर त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आह. एबीपीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सीआयडीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे. चौकशी झाल्यानंतर चव्हाण यांनी, मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि या दरम्यान धनंजय मुंडे यांच्या पीआरचं काम वाल्मिक कराड हे बघायचे. माझा त्यांचा संपर्क सुद्धा होत होता. मी त्यांना ओळखतो का हे विचारण्यासाठी मला आज पोलिसांनी बोलून घेतले होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातून संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुखांच्या आरोपीला तातडीने अटक करावी, आणि कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. इतकेच नव्हे तर, संतोष देशमुखांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास लागावा यासाठी बीडमधील रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चाही काढण्यात आला. रेणापूरमधील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय या मार्गावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात संतोष देशमुख यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही सहभागी झाले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.
संतोष देशमुखांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. संतोष देशमुख्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तसेच, आरोपीना पाठिशी घालणाऱ्या आणि त्यांचा बचाव करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही बडतर्फ करा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, संतोष देशमुख यांच्या कुटुबियांची जबाबदारी शासनाने घ्यावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशीही मागणी एका आंदोलकाने केली आहे. “संतोष देशमुख यांच्यासारख्या सरपंचाचा बेदम मारहाण करुन निर्घृण खून करण्यात येतो, मग आमच्यासारख्या सर्ववसामान्यांच काय? असा प्रश्न उपस्थित करत एका आंदोलकाने देशमुखांच्या आरोपींवर मोक्का अतंर्गत कारवाई करुन त्याला शिक्षा द्यावी” अशी मागणी केली.