सातारा : साताऱ्यात बाजार समितीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भूमिपूजनाला भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी विरोध केला होता. मात्र, त्यांचा हा विरोध झुकारून आमदार शिवेंद्रराजे (Shivendraraje Bhosale) यांनी भूमिपूजन केले. यावरूनच उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमनेसामने आले.
शिवराज ढाब्याजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले. मात्र, याच कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने आले आहेत. सकाळी दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचं भूमिपूजन होणार होतं. मात्र, त्यापूर्वी नऊ वाजता उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि तिथं असलेलं साहित्य फेकून दिलं. तसेच, एक कंटेनरही जेसीबीनं नष्ट केला. इतके होऊनही शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारून त्यांच्यासमोरच भूमिपूजन केलं.
माझ्या जागेत भूमिपूजन करायचं नाही
‘माझ्या जागेत भूमिपूजन करायचं नाही’, असे म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांना झापलं. वाद सुरू असतानाच शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंसमोर भूमिपूजन केले. त्यानंतर काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी मध्यस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली.