Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्धाला आता लवकरच मिळणार पूर्णविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांत पाठवले दूत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : मागील दोन वर्षांपेक्षा जास्त काळ सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध आता थांबण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याची बहुचर्चित योजना आता सुव्यवस्थित आणि अंतिम झाली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. पुढील फेरीच्या शांतता चर्चेला सुरुवात करण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये विशेष दूत पाठवले आहेत, असे ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आले.
अमेरिकन उद्योगपती आणि जवळचे सहकारी स्टीव्ह विटकॉफ यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी पाठवण्यात आले आहे, तर लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल युक्रेनियन अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. ते भविष्यात पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांना प्रत्यक्ष भेटू शकतात, परंतु चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतरच हे सर्व घडून येईल, असेही सांगण्यात आले.
हेदेखील वाचा : Russia EU Uk Conflict : युरोप हादरला! कीवमध्ये रशियाचा विध्वंसक हल्ला; ईयू व ब्रिटिश कॉन्सिल कार्यालये जमीनदोस्त
दरम्यान, अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांनी अबुधाबीमध्ये रशियन अधिकाऱ्यांशी दोन दिवसीय चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक दिशेने प्रगती करत आहेत आणि अपेक्षा मजबूत आहेत.
रशियाचा युक्रेनवर पुन्हा हल्ला
सोमवारी रात्री उशिरा रशियाने युक्रेनची राजधानी कीव येथे ४६० हून अधिक ड्रोन आणि २२ क्षेपणास्त्रे डागली, ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले. युक्रेनने रशियाच्या दक्षिणेकडील भागातही ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.
युरोपीय नेत्यांची चिंता
ट्रम्प यांच्या योजनेमुळे युरोपमध्येही खळबळ उडाली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शांतता चर्चा एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे आणि ती पुढे नेण्याची वेळ आली आहे. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी असेही म्हटले की, झेलेन्स्की यांनी चर्चेदरम्यान बहुतेक मुद्द्यांवर सकारात्मक संकेत दिले आहेत. पण, युक्रेनचे प्रतिनिधी ओलेक्झांडर बेवेझ यांनी स्पष्टपणे सांगितले की अंतिम करारावर पोहोचणे खूप लवकर आहे.
युद्ध संपवण्यासाठी पावले उचलणे शक्य
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, युद्ध संपवण्यासाठी आवश्यक पावले आता व्यावहारिक होत आहेत आणि ते लवकरच ट्रम्प यांच्याशी संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा करतील.






