पुणे : पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील क्लोजर रिर्पोट फेटाळत न्यायालयाने पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच या गुन्ह्यात पूर्ण तपासाचे आदेश दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रकला पाटील यांनी १४ डिसेंबर रोजी याबाबत आदेश दिले आहेत.
रश्मी शुक्ला याच्याविरोधात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा क्लोझर रिपोर्ट फेटाळला. तसेच न्यायालयाने याबाबत तपास अधिकाऱ्याला जमविलेल्या पुराव्या व माहितीच्या आधारे आणखी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच आणखी पुरावे गोळा करण्याचे आदेश देताना त्यासंबधीचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे म्हटले आहे. दरम्यान सर्व कागदपत्रे पुन्हा तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्त करण्याचेही न्यायालयाने आदेशात दिले असून, झेरॉक्सची कॉपी न्यायालयाच्या दफ्तरी दाखल करण्याचे नमूद केले आहे.
राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्तांनी या गुन्ह्याचा तपास केला व तपास करून क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला होता.
म्हणून केला होता क समरी अहवाल
तपास अधिकार्याने दाखल केलेल्या अहवालात जे मोबाईल नंबर टॅपिंगला लावले होते. त्या मोबाईलद्वारे जी माहिती मिळाली ती कोठेही लिक झाली नाही. तसेच गुन्ह्यातील तथ्य व केसमधील परिस्थितीजन्य माहिती त्या आधारे तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कोणताही गुन्हा केला नसल्याचे नमूद करत क समरी अहवाल दाखल केला होता. तपास अधिकार्याने दाखल केलेल्या क समरी अहवालावर अतिरिक्त सरकारी वकील वाधवणे यांनी देखील माहिती देणार्या व तपास अधिकार्याच्या अभिप्रायावर योग्य तो आदेश देण्याची मागणी केली.
– संबंधित तत्कालीन अधिकार्याचा जबाब महत्त्वाचा
याबाबत गुन्हे शाखेत काम करत असलेल्या अधिकाऱ्याच्या नोंदविलेल्या जबाबात जे नंबर टॅपिंगला लावले होते त्याचा कोणताही संबंध ड्रग्ज सेलरशी नसल्याचे व ही बाब रश्मी शुक्ला यांना सांगितल्याचे त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये म्हटले आहे. तो नंबर एका राजकीय व्यक्तीचा असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी तो नंबर तसाच ऑब्जरवेशनसाठी ठेवण्याचे व झालेल्या संभाषणाबाबतचे कळविल्याचे म्हटले आहे.
तपासावर ओढले ताशेरे अन् नोंदविले निरीक्षण
न्यायालयाने क समरी अहवालावरून नोंदविलेल्या साक्षीदारांच्या जबाबावरून प्राथमिकदृष्ट्या रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुरावे आढळून येत असल्याचे निरीक्षन न्यायालयाने नोंदविले. टँपींग केलेल्या मोबाईल नंबरचे संभाषण एका सीडीमध्ये रेकॉर्ड केले होते ती सीडीच न्यायालयात जमा केली नाही. तपास अधिकार्याच्या या गुन्ह्यातील तपासातील त्रुटी असल्याबाबत ताशेरे ओढले आहे. त्यामुळे तथ्य व परिस्थिती जन्य पुराव्याआधारे या गुन्ह्यात तपास करण्यासाठी संधी असल्याचे नमूद केले आहे.