माळेगावच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली,अजित पवारांचा गौप्यस्फोट(संग्रहित फोटो)
बारामती : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रराव तावरे यांच्यासोबत जुळवून घेत काहीतरी मार्ग काढा, अशी मध्यस्थी केली होती, असे स्पष्टीकरण देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
‘आम्ही विचार करून सांगतो म्हटल्यावर विरोधकांनी त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. आपल्यासाठी चांगले वातावरण आहे’ असे सांगितले. मग ठरवले आपण पॅनल करायचा आणि तुम्ही भरघोस मतांनी श्री निळकंठेश्वर पॅनलला निवडून दिलेत. आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो आहे, असे पवार यांनी शिवतीर्थ कार्यालयात आभार सभेत सांगितले.
शनिवारी (दि.२८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विजयाच्या आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकरी व सभासदांनी श्री निळकंठेश्वर पॅनलला भरघोस मतांनी निवडून देत सत्य व विकासाच्या बाजूने मतदान केले. त्यांचा आभारी असल्याचे म्हटले. तसेच कारखान्याचा कारभार पारदर्शक व शिस्तबद्ध करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. कारखान्याच्या हितासाठी आमचे संचालक मंडळ कमी पडणार नाही, असा शब्दही यावेळी दिला.
याशिवाय, आम्ही सहकारी साखर कारखाना कसा चालवतो हे विरोधकांना दाखवायचे आहे, असे सांगत भविष्यात कारखाना, शिवनगर प्रसारक मंडळातील शिक्षण, प्रयोगशाळेचा दर्जा, आयटीआयचे विस्तारीकरण, एआय तंत्रज्ञान यावर काम करणार आहे. कारखाना हा आपला प्रपंच असून हा विजय आपल्या सर्वांचा आहे, असे पवार यावेळी म्हणाले.