देवेंद्र फडणवीसांचे शिंदेंच्या विधानावर भाष्य (फोटो- ट्विटर)
मुंबई: पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दौऱ्यावर आले होते. यावेळी गुजरात भवन येथे कार्यक्रमामध्ये अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना भाषण दिले. भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली आहे. यामुळे आता राज्यामध्ये वाद पेटला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
आजचा दिवस संपूर्ण गुजरात समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. याठिकाणी मी बघत येत होतो. येथे काहीही कमी नाही. तुम्ही सगळे लक्ष्मीपुत्र आहात. पैसे कमी पडण्याची गोष्टच नाही. त्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण झाले. ज्या कामांचे भूमिपूजन हे पंतप्रधान मोदी करतात ते काम लवकर पूर्ण होते, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. आमच्यासाठी मोदीजी आणि अमित भाई वेगळे नाही. मोदींची सावली हे अमित शाह आहेत. अमित शाह यांचा स्पर्श झाल्यानंतर त्या कार्याचे सोने होते.
मला आनंद दिघे यांनी सांगितलेली गोष्ट आठवत आहे. कोणतेही शहरं असो, कोणते मोठे गृहसंकुल असो किंवा कोणतेही नवे शहर तयार होवो. पण जो पर्यंत तिथे बाजारपेठ तयार होत नाही तो पर्यंत त्या शहराची शोभा वाढत नाही. आणि ही बाजारपेठ बसवणारे तुम्ही व्यावसायिक लोक आहात. त्यामुळे तुमच्या शिवाय कोणत्याही शहराची शोभा वाढत नाही,” असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र, जय हिंद आणि जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्नाटकमधील चिकोडी येथे एका कार्यक्रमात शरद पवार यांनी जय महाराष्ट्र, जय कर्नाटक असे म्हटले होते. याचा अर्थ त्यांच कर्नाटकवर जास्त प्रेम आणि महाराष्ट्रावर कमी आहे असा होतो का? ज्यांच्या कार्यक्रमात आपण जात असतो, त्यांच्याविषयी आपण बोलत असतो. ”
🕟 4.27pm | 4-7-2025📍Vidhan Bhavan, Mumbai.
LIVE | Media Interaction#MonsoonSession2025 #Mumbai #Maharashtra https://t.co/6TnxEvB47X
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2025
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “एकनाथ शिंदे गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्याने ते जय गुजरात म्हणाले. म्हणजे त्याचे गुजरतवर जास्त प्रेम आणि महाराष्ट्रावर कमी प्रेम असे होत नाही. मराठी माणसाला इतका संकुचित विचार शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला आहे.