एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक (फोटो- ट्विटर)
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान महायुतीने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. २९ तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र अजूनही काही जागांवर महायुतीचा तिढा सुटणे बाकी असल्याचे समजते आहे. दरम्यान माहीमचे आमदार सदा सरवाणकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली. यावेळेस अमित ठाकरे यांच्या विषयावरून बैठकीत चर्चा झाल्याचे समजते आहे.
सदा सरवणकर हे माहीम मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. दरम्यान याच मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे मनसेसाठी ही जागा अत्यंत महत्वाची समजली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. दरम्यान युतीचा धर्म पाळण्यासाठी सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा भाजपचा आग्रह असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अर्ज मागे घेण्यास सरवणकर तयार नसल्याचे समोर येत आहे.
या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्वाची चर्चा पार पडली. या बैठकीत माहीमचे आमदार सदा सरवणकर यांना देखील बोलवण्यात आले असे समजते आहे. यावेळेस सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे समजते आहे. मात्र यावर सदा सरवणकर यांनी स्पष्ट भूमियक घेत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे समजते आहे.
शिवसेनेत फुट पडली आणि आपण उठाव केला त्यावेस मी तुमच्यासोबत होतो, असे सरवाणकर मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते आहे. मी सुद्धा कबड्डीचा खेळाडू आहे, त्यामुळे मी मैदानातून मागे हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता युती धर्म पाळायचा असल्यास कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे- फडणवीस यांच्याकडून काही जागांचा तिढा सुटला?
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ ही शेवटची तारीख आहे. मात्र महायुतीकडून अजून काहीजागांवर उमेदवार जाही होणे अजूनही बाकी आहे. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली वर्षा बंगल्यावरील बैठक सकारात्मक झाल्याचे समजते आहे. दरम्यान आजच्या बैठकीत ८ ते ९ जागांवरील तिढा सुटल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आज किंवा उद्या महायुतीची उर्वरित यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.