सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे. लोकांना कर्जमाफीची सवय लागली आहे आणि आम्हाला निवडून यायचे असल्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासने देतो, असं बाबासाहेब पाटील यांनी विधान केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक या विधानावरुन आक्रमक झाले आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरुन प्रतिक्रीया दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे हे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना असे विधान करून त्यांनी जखमेवर मीठ चोळले आहे. फडणवीस सरकारमधले मंत्री वाचाळ, बेशरम व बेताल आहेत, मंत्र्यांने असे विधान करून ते जुमलेबाजी करून सत्तेत आले आहेत हे स्पष्ट केले आहे, अशा बेताल मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे पण मुख्यमंत्री फडणवीस स्वतःच अशा मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असे सपकाळ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची काँग्रेस पक्षाची तयारी सुरु असून, राज्यतील सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका झाल्या आहेत. मतदार याद्यांच्या पडताळणीचे काम सुरु आहेत. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांचे अर्जही मागवले आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीकडे हे जमा केले जातील त्यांच्याकडून ते प्रदेश काँग्रेसकडे येतील व प्रदेश काँग्रेस त्यावर निर्णय घेईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कबुतरांची चिंता करताना माणसाच्या आरोग्याचीही चर्चा केली पाहिजे तसेच कबुतरखान्यासाठी पुढाकार घेणारे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विशेष लोढा कबुतरखाना टॉवर उभे करावे यावरही चर्चा व्हायला हवी, असे सपकाळ म्हणाले. तसेच वराह जयंतीनंतर आता छटपूजेचा मुद्दा भाजपा आणत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला जातीपातीची, धर्माची व सण उत्सवाची आठवण होते असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.