सौजन्य - नवराष्ट्र टीम
महानगरपालिका प्रचारासाठी सोलापुर दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते पुढे म्हणाले की, स्थानिकच्या निवडणुकीत राज्यात तीन खून झाले आहेत, हे असुरी राजकारणाचे भयावह चित्र आहे. भारतीय जनता पक्ष कोयता गँग, वरळी मटका, ड्रग्ज माफिया यांना उमेदवारी देत आहे. तुळजापूरमध्ये भाजपाने ड्रग्ज माफियाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. गुन्हेगारच नाही तर बलात्काऱ्यांनाही भाजपा संरक्षण देत आहे. नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत शहरातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे पण सत्ताधारी पक्ष मात्र मराठी, हिंदी, उर्दू भाषा व महापौर कोण पाहिजे, मराठी की परप्रांतीय, यावर चर्चा केली जात आहे. सत्ताधारी पक्षाने बिनविरोधचा चालवलेला सपाटा अत्यंत चुकीचा आहे, या बिनविरोधच्या ठिकाणी नोटाचा पार्याय ठेवा व लोकशाही वाचवा, असे सपकाळ म्हणाले.
काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी अदानीच्या विरोधात जी भूमिका घेतलेली आहे ती रास्तच आहे. काँग्रेस पक्ष भांडवलदारांच्या विरोधात नाही पण मोदी सरकार ज्या पद्धतीने देशातील सर्वच क्षेत्रात अदानीला मुक्तहस्ते संचार करु देत आहे, ते देशासाठी अत्यंत घातक आहे. राहुल गांधी जे सांगत आहेत तेच काल शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रीय संत अदानीसाठी भाजपा पखालीने पाणी घालत आहे. काँग्रेसची केंद्रात सत्ता आली तर ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटीश सरकारने जशी ताब्यात घेतली तसे अदानी व अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करू, असे सपकाळ म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, वंचितबरोबर काँग्रेसची मुंबई, लातूर व नांदेडमध्ये आघाडी आहे, ही आघाडी केवळ राजकीय नाही तर विचारांचा मेळ आहे. ती पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, मित्रपक्षाने नाहक, अनावश्यक विधाने टाळायली हवीत. खासदार प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षात आहेत व राहतील असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.






