मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये राज्यासह देशामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत झाली. महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या असून त्यामध्य देखील कॉंग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी युतीमधील मित्रपक्ष असलेल्या शरद पवार गट व ठाकरे गट यांना इशारा दिला आहे.
नाना पटोले यांचा इशारा
राज्यातील एकूण 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 जागा तर महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये शरद पवार गटाला 8 तर ठाकरे गटाला 9 अशा जागा मिळासल्या आहेत. तर सर्वांत जास्त कॉंग्रेसला 13 जागा मिळाल्या आहेत. भाजपपेक्षा देखील राज्यामध्ये कॉंग्रेस सरस ठरला असून भाजपपेक्षा जास्त जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील निकालावरुन शरद पवार गट व ठाकरे गट यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इशारा दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.
लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं
नाना पटोले म्हणाले, कॉंग्रेसने नेहमी मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. जागावाटपातही कॉंग्रेसने मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे. आम्ही आधीही मोठ्या भावाची भूमिका बजावली यापुढे देखील बजावू. कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आमच्या सोबत असलेले आधी गट होते आता पक्ष होतील. आमची मूळ भूमिका सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आहे. पण लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं, एवढाच एक सल्ला आहे. असा टोला नाना पटोले यांनी लगावला. त्यांच्या या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी शरद पवार गट व ठाकरे गटाला इशारा दिला आहे.