संग्रहित फोटो
लासलगाव : जय जनार्दन अनाथ गोशाळेत सुमारे चाळीसहून अधिक गायी व वासरू आहेत. या गायींना (Cow) सध्या चाराच मिळत नसल्याने चाऱ्यासाठी वणवण, भटकंती करावी लागत आहे. चाऱ्याअभावी गायींचे होणारे हाल पाहवत नसल्याने येथील गायींसाठी समाजातील दानशूरांनी चारा दान करावा, असे आवाहन गोसेवक सचिव दिलीप गुंजाळ, कीर्तनकार संगितामाई गुंजाळ यांनी केले आहे.
शास्त्रीनगर, पिंपळगाव (नजिक) लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ गोशाळा असून, कुठलाही शासकीय निधी न घेता, लोकांनी दिलेल्या देणगीतून गायींचे संगोपन केले जाते. सद्यःस्थितीत गोशाळेत चाळीसहून अधिक देशी गायींचे दिलीप गुंजाळ संगोपन करतात. या गायींना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी परिसरातील ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य लाभते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गायींना चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. या परिसरात दीड ते दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कुठेही चारा नसल्याने गायींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
चारा मिळावा, यासाठी दिलीप गुंजाळ, संगीता गुंजाळ यांची दररोज धडपड सुरु असते. गोशाळेतील गायींसाठी चाऱ्याची सढळ हाताने मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी देखील पुढे यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.