पुणे : पुण्यातून धक्कादायक घटना उघडकीस (Pune Crime) आली असून, पोटच्या 13 वर्षीय मुलीला जिवंत कॅनोलमध्ये फेकून तिचा खून केल्याची (13 Years Girl Killed) घटना उघडकीस आली. याप्रकरणानंतर वडिलांनी स्वत: विषारी औषध पिऊन आत्महत्येचा (Consume Poisonous Liquid) प्रयत्न केला. यात त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरात या घटनेने खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून कॅनोलमध्ये मुलीचा शोध घेतला जात आहे. पण, सायंकाळपर्यंत तिचा मृतदेह मिळू शकला नाही.
तनुश्री संदीप शिंदे (वय १३) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. याबाबत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. शुक्रवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला असून, मित्र मंडळ चौकातील वीर सावरकर पुतळ्या पाठिमागील कॅनोलमध्ये मुलीला टाकून दिले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास हा प्रकार समोर आल्यानंतर अग्निशमन दल आणि स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
चारित्र्याच्या संशयावरून व्हायचे वाद
तनुश्रीच्या आई-वडिलांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून वाद आहेत. काही दिवस ते वेगळेही राहत होते. दरम्यान, आई ब्युटी पार्लर चालविते. तर वडिल रिक्षा चालक आहेत. त्यांना दारूचे व्यसन होते. आर्थिक आणि चारित्र्याच्या संशयावरून तो वाद घालत होता.
दरम्यान, पुन्हा ते एकत्र राहत होते. त्याने दारू देखील पिणे सोडून दिले होते. मात्र, काही दिवसांपासून तो पुन्हा दारू पिऊन वाद घालू लागला. घराचा अर्धा खर्च करण्यावरून तसेच चारित्र्याच्या संशयावरून वाद वाढल्याने तनुश्री आई महिन्याभरापूर्वी घर सोडून बहिणीकडे राहण्यास गेली.
घटस्फोटाची पाठवली होती नोटीस
तनुश्री देखील आईसोबतच राहत होती. तर, वडिल धनकवडी येथे राहत होते. वडिल संदीप शनिवारी व रविवारी तनुश्रीला घेऊन येत असत. वडिलांसोबत ती राहत होती. यादरम्यान, आठ दिवसांपूर्वी संदिप याने पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठविली होती, असे पोलिसांनी सांगितले.