देवेंद्र फडणवीस यांचे देशमुखांना आव्हान (फोटो- ट्विटर)
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मनसुख हीरेन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत चांगलाच उचलून धरला होता. त्यानंतर जे काही घडले ते राज्यातील सर्व जनतेला माहिती आहेच. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील अनेक आरोप करण्यात आले होते. दरम्यान यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना थेट आव्हानच दिले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मनसुख हीरेन याची हत्या होणार आहे हे अनिल देशमुख यांना माहिती होते की नाही असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे असे थेट आव्हानच फडणवीस यांनी देशमुखांना दिले आहे. या प्रश्नाचे उत्तर ते देणार नाहीत हे मला माहिती नाही, मात्र माझी तशी अपेक्षाही नाही असे फडणवीस म्हणाले आहेत.
मनसुख हीरेन हत्येच्या प्रकरणामध्ये विधानसभेत मी शंका उपस्थित केली होती. त्यावेळेस मनसुख हीरेन यांना गायब करण्यात आले तसेच त्यांची हत्या होऊ शकते अशी मी भीती सदनामध्ये व्यक्त केली होती. त्यामुळे माझे असे मत आहे की, अनिल देशमुख यांनी यावर उत्तर दिले पाहिजे. ते यावर भाष्य करणार नाहीत. मात्र याचे उत्तर कधी नया कधी बाहेर येईलच, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
खोटे बोलण्यासाठी विचार करावा लागतो. मात्र खरे बोलण्यासाठी विचार करावा लागत नाही. सत्य कधी न कधी बाहेत येतच असते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. अनिल देशमुख यांनी ट्वीट करत मला जेलमध्ये त्रास झाल्याचे सांगितले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये देशमुख तुरुंगात गेले. त्यानंतर ते जवळपास ११ महीने ते तुरुंगात होते. त्यातील आठ महीने महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते. मग जेलमध्ये त्यांच्याच सरकारने त्यांन त्रास दिला का ?असा माझा प्रश्न आहे.
अनिल देशमुख यांनी असे आरोप करायला आत्ताच का सुरुवात केली? उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षाने केवळ देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी रणनीती तयार केली आहे. भाजपला रोखायचे असेल तर केवळ फडणवीस यांना टार्गेट केले पाहिजे असे त्यांना वाटत असेल. त्याचाच एक भाग म्हणून देशमुख यांनी आरोप करण्यास सुरुवात केली आहे.