दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा आणखी एक प्रताप समोर; करमाफी मिळावी म्हणून थेट... (File Photo : Dinanath Hospital )
पुणे / दीपक मुनोत : पुण्यात केवळ दीनानाथ मंगेशकर या एकमेव रूग्णालयाकडून रूग्णभरतीच्यावेळी अनामत रक्कम घेतली जात नाही, असा दावा करत रूग्णालय विश्वस्तांनी, राज्य सरकारकडून लाखो रूपयांचा बिनशेती (अकृषिक) कर माफ करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने, महापालिकेचा कोट्यवधी रूपयांचा मिळकतकरही भरलेला नाही, त्यापाठोपाठ हा प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला, राज्य सरकारने २००० साली एरंडवण्यातील तब्बल ६ एकराचा अब्जावधी रूपयांचा भूखंड हा अगदी नाममात्र म्हणजे एक रूपये वार्षिक भाडेपट्ट्यावर दिला आहे. या धर्मादाय रूग्णालयात, दहा लाख रूपये अनामत रक्कम न भरल्याने, उपचार नाकारल्याने तनिषा भिसे या सात महिन्याच्या गर्भवतीचे पंधरवड्यापूर्वी मृत्यू झाला होता. तनिषा या भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहायकांच्या पत्नी. त्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे विश्वस्त डॉ. धनंजय केळकर यांनी, आमच्या रुग्णालयाकडून, कोणत्याही रूग्णाकडून भरतीच्यावेळी अनामत रक्कम घेतली जात नाही, असा दावा करत दंडमाफी मिळवल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत, सविस्तर माहिती अशी की, महालेखाकार (कंट्रोलर ॲंड ऑडीटर जनरल – कॅग) यांनी २०१५- १६ या आर्थिक वर्षाच्या आपल्या अहवालात, लता मंगेशकर मेडीकल फाऊंडेशन ॲंड रिसर्च सेंटर ॲंड मेडीकल कॉलेज संचलित दिनानाथ रूग्णालय चालवण्यात येते. रूग्णालय संचलन हे ʻव्यापारीʼ आस्थापनेत येते. त्यामुळे या २४ हजार चौरस मीटरच्या भूखंडाला, निवासी नव्हे तर व्यापारी प्रयोजनार्थ बिनशेती कर लावून तो वसूल करावा, असा लेखापरीक्षण शेरा मारला. त्यानुसार, प्रतिचौरस मीटर १४.६५ रूपये या दराने २००१ ते २०१६ या १६ वर्षासाठीची रक्कम वसूल करावी, असे सूचवले. २०१६ साली ही रक्कम ५८ लाख ६० हजार रूपये होत असल्याचेही महालेखाकारांनी आपल्या ऑडिट अहवालात नमूद केले होते.
इतकेच नव्हे तर, आम्ही काढलेली शेतसाऱ्याची रक्कम ही २००१ पासूनची आहे. मात्र, संस्थेला हा भूखंड २३ ऑगस्ट १९८९ ला दिला असल्यामुळे १९८९ ते २००१ पर्यंतच्या कालावधीत वसुली केली आहे की नाही, ते पडताळून ती रक्कमही वसूल करावी, असेही स्पष्टपणे नमूद केले होते.
या ऑडीट शेऱ्यावर तत्कालीन तहसीलदारांनी, ही वसुली संबंधित तलाठ्यामार्फत करण्यात येईल, असे महालेखाकार कार्यालयाला कळवले होते.
दरम्यान, तलाठी कार्यालयाने २७ जुलै २०१७ रोजी दीनानाथ रूग्णालयाला वसुलीची नोटीस पाठवली. त्या वसुलीला विरोध करताना रूग्णालयाच्या वतीने डॉ. धनंजय केळकर यांनी २ सप्टेंबर २०१७ ला तहसिलदारांना दिलेल्या पत्रात अन्य मुद्दे नमूद करतानाच, ʻपुण्यातील रूग्णालयांमध्ये एकमेव वैशिष्ट्य म्हणजे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात कोणत्याही रूग्णाकडून भरतीच्यावेळी अनामत रक्कम घेतली जात नाहीʼ, असे बोल्ड शब्दांत नमूद केले आहे.
शिवाय, मंगेशकर रूग्णालयामार्फत अनेक गरजू व गरीब रुग्णांवर अद्यावत उपचार हे मोफत व सवलतीच्या दरात केले जातात. हे रूग्णालय धर्मादाय असून, ʻना नफा ना तोटाʼ या तत्वावर चालवण्यात येते, असाही दावा केला आहे. इतकाच नव्हे तर रूग्णालयातून मिळणारे पैसे हे गरीब रूग्णांसाठी व ट्रस्टच्या उद्दीष्टासाठी वापरले जातात, असेही नमूद करण्यात आले आहे. गरीबांना १० ते १०० टक्के सवलत दिली जाते इतकेच नव्हे गरिबांना आम्ही मोफत जेवणही पुरवतो, काही असेही पत्रात म्हटले आहे.
प्रांताधिकाऱ्यांनी अहवाल लावला फेटाळून
संबंधित दावा, तहसिलदार इतकेच नव्हे तर प्रांताधिकारी यांनीही फेटाळून लावला.
अंतिमत: या प्रकरणाची क्वासी ज्यूडीशियल सुनावणी अपर जिलहाधिकारी विजय देशमुख यांच्यापुढे झाली. त्यांनी अपील अर्ज अंशत: मंजूर करीत सुमारे १४ लाख ६५ हजार रूपये भरून घेतले.
‘दीनानाथ’च्या विश्वतांकडून संपर्कास प्रतिसाद नाही
या संदर्भात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. धनंजय केळकर यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.