देहू नगरपंचायत पालखी सोहळ्यासाठी सज्ज; तब्बल 'इतक्या' कॅमेऱ्यांची असणार नजर (संग्रहित फोटो)
देहूगाव : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूनगर पंचायत प्रशासनाने वारकरी भाविकांच्या सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन विविध ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पालखी मार्गावरील तसेच मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या सोसायट्या, धर्मशाळा आणि दिंडी थांबणाऱ्या भागांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने १००९ फिरती शौचालये उभारण्यात आली असून जर्मन टेंट परिसरात आणखी १०० फिरती शौचालये बसविण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी एकूण ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी २२ ठिकाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत प्रकाशझोत उभारण्यात आले आहेत. इंद्रायणी नदी परिसरात महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय प्रत्येक दिंडीसाठी प्राथमिक उपचार पेटी देण्यात येणार असून आरोग्य व प्रवासासंबंधी कोणतीही मदत आवश्यक असल्यास एकाच ठिकाणी संपर्क कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे. स्वच्छता आणि साफसफाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळही नियुक्त करण्यात आले आहे. वारकरी भाविकांचे स्वागत आणि सेवा करण्यासाठी देहूनगर पंचायतीने सर्वंकष नियोजन केले असून पालखी सोहळा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विठुरायाच्या वारीत आता आकाशातूनही आरोग्यसेवा
आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने यंदा प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य सुविधांच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. वारकरी घरातून वारीसाठी निघाल्यापासून ते सुखरूप घरी परतेपर्यंत आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.






