संग्रहित फोटो
सासवड/संभाजी महामुनी : राज्य शासनाने लाखो रुपये खर्च करून पुरंदर तालुक्यातील गावाचा ड्रोनद्वारे सिटीसर्व्हे केला. त्याची सनद नागरिकांना उपलब्ध करून दिली. मात्र सिटीसर्व्हेमध्ये प्रचंड प्रमाणात चुका असून गावोगावच्या सत्ताधार्यांनी मनमर्जीनुसार सर्व्हे केल्याचे उघड झाले आहे. याबाबत आमदार विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सिटी सर्व्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता कार्यवाही सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुरंदर तालुक्यात मागील पाच वर्षात ग्रामीण भागातील गावांचा मोठ्या प्रमाणात सिटी सर्व्हेची प्रक्रिया राबवण्यात आली होती. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून राज्याचे जमाबंदी आयुक्तांनी वेळोवेळी पुरंदरला भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला होता. सिटी सर्व्हे केल्यानंतर नागरिकांना सनद दिली जाणार, घरासाठी बँकांचे कर्ज मिळणार अनेक सुविधांचा लाभ मिळणार अशा प्रकारची आश्वासने दिली त्यास नागरिकांनी संमती देवून सिटीसर्व्हे करण्यास प्रतिसाद दिला होता. यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात आली होती. महसूल विभागाने यासाठी लाखो रुपयांची तरतूदही केली होती.
ग्रामस्थांच्या सहमतीने ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावोगावचा ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली. तिथपर्यंत सर्व सुरळीत सुरु होते. आपल्या घराची नोंद व्यवस्थित झाली आहे असेच वाटले होते. मात्र काही नागरिकांनी सनद बारकाईने पाहिली तसेच घरांचे पूर्वीचे ८ अ चे उतारे पाहिल्यानंतर धक्काच बसला. कारण घराची पूर्वीचे क्षेत्रफळ आणि सनदवरील नोंद करण्यात आलेले क्षेत्रफळ यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे दिसून आले.
धक्कादायक प्रकार उघडकीस
काही जागरूक नागरिकांनी ग्रामसभेत विषयाला वाचा फोडली. मात्र धूर्त राजकीय मंडळीनी त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली. याची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली. अनेक गावातील जागरूक नागरिकांनी माहिती अधिकाराचा वापर करून कागदपत्रे काढून घेतली असता अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले. अनेक गावांच्या तत्कालीन सरपंच, सदस्यांनी आणि काही ठराविक पुढार्यांनी स्वतःच्या जागेचे असलेल्या क्षेत्रफळपेक्षा जास्त क्षेत्रफळ नोंद करून घेतल्याचे उघड झाले.
पहिल्या बैठकीत विचारले प्रश्न
विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी नवीन मंत्रिमंडळ स्थापनेनंतर जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत पुरंदर तालुक्यातील सिटी सर्व्हेचा गंभीर मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला होता. सिटी सर्व्हेत प्रचंड चुका असून त्या तातडीने रद्द कराव्यात अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे सामान्य नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले होते. दरम्यान आता राज्य विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, यामध्ये विजय शिवतारे सिटी सर्व्हेचा विषय उपस्थित करणार आहेत. तसेच याबाबत शासनाकडून आदेश मिळाल्यास चुकीच्या झालेल्या नोंदी रद्द होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अहवाल वरिष्ठांकडे पाठवला
पुरंदरच्या भूमी अभिलेख अधीक्षक स्मिता गौड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून पुरंदर मधील सिटी सर्व्हेचा अहवाल मागविण्यात आला असून, त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून दिला आहे. तसेच काही कामकाज सुरु आहे. याबाबत आम्हाला अधिकार घेता येत नाहीत, वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.
पुरंदर तालुक्यात झालेल्या सिटी सर्व्हेमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या असून, दुरुस्त करण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो, हे सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. नागरिकांच्या घरासमोरील बखळ जागा ग्रामपंचायतच्या नावाने लावण्याचा डाव केला. त्यामध्ये एखाद्या गावच्या सर्व्हे मध्ये ७० टक्के चुका असतील तर नव्याने फेर सर्वेक्षण करण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यामुळे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.
– विजय शिवतारे, आमदार, पुरंदर