वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर राजीनामा मागणी केली जात आहे (फोटो - फेसबुक)
मुंबई : पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. वैष्णवी हगवणे हिने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे महिलांना सासरी होणारा जाच आणि छळ तसेच राज्यातील हुंडाबळी हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील अनेक महिला नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये महिला नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील पुण्यातील घटनेनंतर रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी तप्तरतेने कारवाई न केल्यामुळे सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “चाकणकरांची रूपाली असंवेदनशीलतेने वागली तरी ठोंबरेंच्या रूपालीने दाखवलेली संवेदनशीलता, वैष्णवीचे बाळ कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. दादा, 100 पैकीं 90 प्रकरणात अत्यंत अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाचे अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिले असेल बरे? हे गंभीर आहे. सरकारी यंत्रणा इतक्या हलगर्जीपणाने कशा काय वागू शकतात..? पत्रकार परिषद घेणाऱ्या चाकणकर बाईंनी डायलॉगबाजी करण्यापेक्षा दहा प्रकरणे सांगावी ज्यात खरेच पिडीतेला न्याय मिळाला आहे,” अशा सोशल मीडिया पोस्ट करुन सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर रोहिणी खडसे यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या की, “चाकणकर यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्यांना धमकवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. रूपाली चाकणकर या वैफलग्रस्त झाल्या आहेत. महिला आयोगाच्याऐवजी आता धमकी आयोग असं नाव ठेवायला हवं. वैष्णवी हगवणेंच्या समर्थनार्थ त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढलेला नाही. तर रूपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढला. चाकणकर स्वत:चं पद टिकवण्यासाठी असे आंदोलन करून घेत आहेत. पदाचा लोभ किती असावा हे या विषयावरून दिसतंय. महिला आयोगाची गुंडगिरी आणि दादागिरी सहन केली जाणार नाही. आताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या धमकी देणाऱ्या आहेत. रूपाली चाकणकर यांची हकालपट्टी होणारच आहे.” अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील चाकणकरांविरोधात कठोर भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे. पेडणेकर म्हणाल्या की, “महिला आयोगाच्या अध्यक्षा कितवी शिकलेल्या असाव्यात याचे काही निकष आहेत. परंतु कशा संस्कारी असाव्यात, संवेदनशील असाव्यात हे मात्र रूपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही. लोकांना ती चिल्लर म्हणते. चिल्लर या बाई आहेत. आता हे लोक उघड उघड बोलायला लागले आहेत. अशा चिल्लर थिल्लर बाई अध्यक्ष म्हणून ठेवत असतील किंवा त्यांच्यावर कुठल्या संस्थेचा किंवा पक्षाचा दबाव नसेल तर महाराष्ट्र कुठे चालला आहे. अशा बाईला पहिलं पदावरून काढून टाकावं. तिथे एक सक्षम महिला नियुक्त करावी,” अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर अजित पवार गटाच्याच नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील याबाबत टायमिंग साधून राज्य महिला आयोगावर निशाणा साधला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, “सहा महिन्यांपूर्वी मयुरी हगवणे हिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. यामुळे तिने राज्य महिला आयोगावर आरोप केले आहे. तिने केलेल्या तक्रारीवर कार्यवाही झाली नाही असे मयुरीचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य महिला आयोग आणि पोलीस यंत्रणा यांची चौकशी व्हावी, आणि यामध्ये काही कर्तत्वामध्ये कसूर दिसली तर निश्चित कारवाई करावी,” असे मत रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि करुणा मुंडे यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.