मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी राज्याचा सर्व गाडा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाकत आहे. त्यांच्याकडे सहा जिल्ह्याचा भार आहे, अशात कामाचा ताण त्यांच्यावरील वाढला असल्याने त्यांना गृहमंत्री पद झेपत नाहीत. त्यांच्या मंत्रिमंडळातील नेते बेताल वक्तव्य करत आहे, मात्र, त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरत आहेत अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
सुषमा अंधारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत महिलांविरोधात अपशब्द काढणाऱ्या सर्व नेते मंडळींवर तोफ डागली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. अंधारे म्हणाल्या, भाजप सत्तेत आल्यापासून महिलांबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील अनेक नेते हे बेताल वक्तव्य करत आहेत. राज्यातील भाजपचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते रामदास कदम यांनी देखील दहीहंडीत मुलींबद्दल बेताल वक्तव्य केले. तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. नुकतेच संभाजी भिडे हे एका महिला पत्रकारासोबत टिकली लवण्यावरून असभ्यपणे पणे बोलले. मात्र, उपमुख्यमंत्री एक चकार शब्द देखील बोलले नाहीत. अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस टिकलीवरुन बोलतील का? असा प्रश्न अंधारे यांनी विचारला.
ज्या पद्धतीने अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल वाईट शब्दांत वक्तव्य केले. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. नारायण राणे आणि त्यांची दोन मुले हे देखील महिलांबद्दल अतिशय वाईट शब्दांत वक्तव्य करत असतात. गुलाबराव पाटील हे देखील सरंजामी वृत्तीचे असून त्यांची वाक्य देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयाला आक्षेपार्ह वाटत नाही. पोलीस देखील गुलाबराव पाटलांचे हस्तक आहेत, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.