महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
पुणे : केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पादन अभियान (नॅशनल मन्युफॅक्चरिंग मिशन) सुरू करत असताना त्याबरोबरीने महाराष्ट्र शासनही ‘राज्य उत्पादन अभियान’ सुरू करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच राज्यात जागतिक दर्जाची ‘ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले.
नीती आयोगाच्यावतीने यशदा येथे ‘रिइमॅजनिंग मॅन्युफॅक्चरिंग : इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लिडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावर आयोजित ‘द रोड टू इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या परिषदेत ते बोलत होते. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासंदर्भातील रोडमॅप असलेला अत्यंत चांगला अहवाल पुण्यात प्रकाशित केल्याबद्दल नीती आयोगाला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यात या क्षेत्रातील उन्नत तंत्रज्ञान पाहायला मिळते. उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी नव्या विचाराने पुढे जावे लागेल. त्यासाठी फ्रंटियर टेक्नॉलॉजी आवश्यक आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे जागतिक स्पर्धेत स्थान पक्के करण्यासोबत नव्या क्रांतीला सामोरे जाणे गरजेचे आहे. आज ‘एआय’, क्वांटम कंम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टर्स या तीन स्तंभांनी प्रत्येक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रभावित केले आहे. त्याचा फायदा उठविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले की, देशाला प्रगत उत्पादन (ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात पुढे नेताना त्याचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, त्यासाठी राज्याचे मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू केले जाईल. राज्याने विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन तयार केले असून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील परिवर्तन हादेखील त्याचा एक भाग आहे. ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंगला चालना दिली जाणार असून त्यामुळे या क्षेत्रात मोठे परिवर्तन दिसेल. इतर देशांना भारताकडे आकर्षित करताना यासाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्या लागतील. असे केल्यास उत्तम तसेच कल्पक बुद्धिमत्ता असलेल्यांना आपल्याकडे आकर्षित करता येईल. महाराष्ट्राने इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत कृतीदल स्थापन केला असून त्याअंतर्गत १०० सुधारणा करणे निश्चित केले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपिटल झाले आहे. पुणे मॅन्युफॅक्चरिंग, तंत्रज्ञान क्षेत्राचे शहर आहे. पुणे व मुंबईदरम्यान क्वांटम कॉरिडॉर तयार करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. नवी मुंबई डेटा सेंटर शहर असून पुणे-मुंबई दरम्यान इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. या शहरात ही जागतिक दर्जाची ‘ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ उभारण्याचा प्रयत्न राहील. तसेच एज्युसिटी स्थापन करण्यात येत असून त्यात १२ सर्वोत्कृष्ट जागतिक विद्यापीठे येणार असून त्यापैकी ७ विद्यापीठे आली आहेत. महाराष्ट्राला मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात अग्रेसर ठेवताना भारताला ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंगचे ग्लोबल हब बनविण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम म्हणाले, उत्पादन क्षेत्राला वगळून कोणताही देश विकसित होऊ शकत नाही. जगात या क्षेत्रात खूप बदल होत आहेत. हे होत असताना नव्या संधीदेखील निर्माण होतात. देशात राज्य घरगुती उत्पादनात (जीएसडीपी) महाराष्ट्र पुढे आहे. मात्र कायम पुढे राहण्यासाठी निरंतर काम करावे लागते. उत्पादन क्षेत्रात पुण्याचे महत्व मोठे आहे.
मागील अंदाजपत्रकात ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ (नॅशनल मन्युफॅक्चरिंग मिशन) सुरू करण्याचे घोषित केले. त्या अनुषंगाने काम चालू असून लवकरच प्रत्यक्षात सुरू करण्यात येईल. इतर प्रगत देशांनी ज्याप्रमाणे उत्पादन क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले त्याचप्रमाणे आपल्या देशातही आणण्यावर यात भर देण्यात येणार आहे. जगात उत्पादन क्षेत्रात वेगाने बदल होत असून या क्षेत्रात आपल्या समोर नवी संधीदेखील येत आहे. महाराष्ट्र सकल राज्य उत्पादनात, उत्पादन, थेट परदेशी गुंतवणूक, रोजगार यामध्ये अग्रेसर आहे. म्हणून राज्याकडून मोठी अपेक्षा आहे. पुण्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी चांगली परिसंस्था (इको सिस्टीम) असून वाहनउद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग आदी अनेक क्षेत्रात पुणे अग्रेसर आहे. राज्य शासनानेही राज्याच्या मॅन्युफॅक्चरिंग मिशनची सुरुवात करावी आणि त्यासाठी पुणे फ्रॅंटियार तंत्रज्ञानाचे केंद्र बनावे, असे आवाहन त्यांनी केले. फ्रॅंटियार टेक इंडस्ट्रीयल पार्क आणि कामगारांसाठी निवास संकुल उभारावेत, अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
महिंद्रा समूहाच्या रुचा नानावटी यांनी राष्ट्रीय उत्पादन अभियानाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. उत्कृष्ट कृती दल स्थापन करून प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देणे, संशोधन व विकास क्षेत्रावर भर देण्यात येणार असून त्याचबरोबरीने भारताचे एआय मिशन आदी भारताच्या विकासाच्या केंद्रस्थानी असेल, असेही त्या म्हणाल्या. सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी म्हणाले, भारतातील उद्योग क्षेत्रात संशोधन व विकासावर भर देण्याची आवश्यकता आहे. यात गुंतवणूक केल्यास उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ होऊ शकते. उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने यासाठी सोबत काम करणे आवश्यक आहे, असे सांगून पुणे हे मोठी क्षमता असलेले उत्पादन हब आहे, असेही ते म्हणाले.
डेलॉईटचे ईश्वरन सुब्रमण्यन म्हणाले, विकसित भारतासाठी आपल्या जीडीपीची वाढ ६ टक्क्यावरून १२ टक्के आवश्यक आहे. जागतिक व्यापारात सध्याच्या २ टक्क्यावरून १० टक्क्यांवर आपला वाटा नेणे आवश्यक आहे. जर्मनी, दक्षिण कोरिया तसेच चीन देशातील जीडपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा २० टक्क्याहून अधिक वाटा आहे. या बाबी लक्षात घेऊन हा रोडमॅप तयार करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.






