Photo Credit- Social Media 2034पर्यंत देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री...; बावनकुळेंचे सूचक विधान
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचे विधान समोर आले आहे. राज्याचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांपैकी एक ठरवत, त्यांना २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना बावनकुळे म्हणाले, “फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एक ठोस रोडमॅप तयार केला आहे. विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचे पुढील नऊ वर्षांचे नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे. फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्री आहेत.”
डबल इंजिन सरकारवर भर
बावनकुळे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘डबल इंजिन’ सरकारचे जोरदार कौतुक केले. ते म्हणाले, “या जोडीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लवकरच विकसित राज्य बनेल. राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने एकत्र येऊन हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”
शिंदे यांचा सूचक प्रतिसाद
बावनकुळे यांच्या विधानावर विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी थोडक्यात “शुभेच्छा” असे उत्तर दिले. सध्या शिंदे हे महायुती आघाडीचा भाग असून, त्यांनी जून २०२२ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर महायुतीच्या विजयानंतर फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतली आहेत.
रामदास कदम यांचाही पाठिंबा
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही फडणवीसांच्या समर्थनार्थ स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले, “२०८० पर्यंतही फडणवीस मुख्यमंत्री राहिले तरी आम्हाला काही हरकत नाही. आमच्या शुभेच्छा फडणवीस, बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आम्ही सर्वजण एकत्र आहोत, कोणीही आमच्यात फूट पाडू शकणार नाही.”
Akshaya Tritiya: 40 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला ग्रहांचे होणार अद्भुत संयोजन, तयार होणार सुवर्ण योग
महायुतीमध्ये एकजूट
या सर्व घडामोडींवरून महायुती आघाडीतील घटक पक्ष फडणवीस यांच्या नेतृत्वावर एकमताने विश्वास दर्शवताना दिसत आहेत. सर्व नेत्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, महाराष्ट्राला विकसित राज्य बनवण्याच्या दिशेने ते एकत्रितपणे काम करत राहणार आहेत. मात्र, आगामी काळात महाराष्ट्रातील जनता या नेतृत्वावर किती विश्वास टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.