तुळजापुरात भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन, आमदार राणा पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल
यावेळी झालेल्या सभेत आमदार राणा पाटील यांनी सांगितले की, विरोधकांकडून खोटेनाटे आरोप केले जात आहेत. भाजपाचे उमेदवार विनोद गंगणे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी पुढे येऊन आपल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत. जर कोणाकडे काही आरोप असतील, तर त्याचे ठोस पुरावेही दाखवावेत.
तुळजापूरच्या विकासाचे दावे करणाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळातील कामांची यादी दाखवावी. ज्यांच्या कारभारात तुळजापूरचा विकास ठप्प झाला, तेच आज आमच्या कामांवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. भाजपाच्या नेतृत्वात तुळजापूर शहरात रस्ते, स्वच्छता, जलप्रकल्प, बाजार विकास, पर्यटन सुविधा आणि नागरिक सेवा यांना प्राधान्य देऊन अनेक कामे करण्यात आली आहेत. उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) यांचे सरकार असताना त्यांनी तुळजाभवाणीसाठी एक रुपयाचा तरी निधी आणला का, हे त्यांनी दाखवून द्यावे. असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, विकासाच्या आधारे मतदान करा, अफवा आणि खोट्या प्रचाराला बळी पडू नका. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा कार्यकर्ते यांच्यासह सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान भाजप समर्थकांनी घोषणाबाजी करत आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विजयाचा संकल्प व्यक्त केला.
तर दुसरीकडे राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. असे असताना भाजपमध्ये मात्र आरोपींसाठी दारं उघडी केली जात आहेत. गडचिंचले साधू हत्याकांडात आरोपी म्हणून नाव आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्थानिक नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता. मात्र विरोधकांच्या आणि राज्यभरातून केल्या जाणाऱ्या टीकेनंतर तो पक्षप्रवेश आता भाजपने रद्द केला आहे. असं असताना दुसरीकडे राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे.






