आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडमळा पूल कोसळला दुर्घटना स्थळाची पाहणी केली (फोटो सौजन्यस - एक्स)
वडगाव मावळ : पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे काल (दि.15) मोठी दुर्घटना घडली आहे. कुंडमळा येथील लोखंडी पुल कोसळला आहे. यामुळे चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 51 जणांंना रेक्स्यु करण्यात यश मिळाले आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंडमळ्यावर मोठी गर्दी झाली होती. यामुळे अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या घटनेची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली आहे.
इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळलेल्या ठिकाणी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी कास सायंकाळी (दि.15) भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
इंदोरी गावाजवळील कुंडमळा इंद्रायणी नदीवरील पुल कोसळलेल्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमी व्यक्तींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
घटनास्थळी एनडीआरएफ पथक, आपदा मित्र, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था आदी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी मोठ्याप्रमाणात मदत केली आहे. घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेबाबत शासन सतर्क असून यापुढे पर्यटकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार या घटनेतील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या घटनेची माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी या घटनेची दखल घेत घडलेल्या दुर्घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे.