सौजन्य - नवराष्ट्र टीम
इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीचा निर्णय बदला नाहीतर राज्यातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापूर मतदारसंघात होईल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नाराज नेत्यांनी दिला आहे. शुक्रवारी (दि.११) इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे परिवर्तन मेळावा घेऊन नाराज नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविली.
मला एका मामाने आणि एका भाच्याने फसवले आहे. त्यामुळे उद्याची निवडणूक इंदापूरच्या परिवर्तनाची आहे. घाईगडबडीने घेतलेला निर्णय चुकीचा होतो. निर्णय तर होणारच आहे. परंतु घाईगडबडीचा नको. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी निर्णय बदलावा. अन्यथा इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही. काम आम्ही रोखठोक करणार आहोत, असे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी स्पष्ट केले.
प्रवीण माने म्हणाले की, आजचा मेळावा इतिहासामध्ये नोंद करून ठेवावा असा आहे. परंतु या स्टेजवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची कमी आहे. ताई आणि साहेब आमचे कालही दैवत होते, आहेत आणि उद्याही राहतील. भाषणाच्या शेवटी त्यांनी लाख मोलाचा सल्ला आहे, ज्या मैदानात तुमच्या पराभवाची चर्चा चालू असते, त्याच मैदानात आम्ही गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही,असे वक्तव्य केले.
पक्षात शिरले आणि आमच्या शरद पवार साहेबांचा तंबूच घेऊन गेले पण हितं बांबू आहेत. त्यांना प्रधानमंत्री मोदींच्या ठिकाणी नेऊन बसवा. विधानपरिषद द्या, मंत्री करा परंतू त्यांना इंदापूरची उमेदवारी नको, असे म्हणत सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता भाषणातून जोरदार हल्लाबोल केला. माने म्हणाले की, शरद पवार म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांचा रिपोर्ट चांगला आहे. पण हर्षवर्धन पाटील सर्वांना मॅनेज करतात. आता इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने परिवर्तन करणार असल्याचे ठरवले आहे. त्यामुळे ही गर्दी पाहून निर्णय बदला. अन्यथा बंडखोरी झाल्याशिवाय राहणार नाही. सांगली पेक्षा मोठा पॅटर्न इंदापूर मध्ये दिसणार, असे दशरथ माने म्हणाले.
या परिवर्तन मेळाव्यास महिला आणि नागरिक उपस्थित होते. प्रसंगी, नको आजी नको माजी इंदापूरला हवा नवा बाजी, इंदापूरचा कारभारी स्वच्छ चारित्र्याचा, प्रामाणिक, उच्चशिक्षित आणि लोकांची कामे करणारा पाहिजे. आणि तो फक्त एकच प्रवीण माने अशा आशयाचे बॅनर कार्यकर्त्यांनी झळकविले.
आजी-माजी आमदारांनी विकासाच्या राजकारणापेक्षा नकारात्मक राजकारण केले. इंदापूर तालुक्यातले नकारात्मक राजकारण आपल्याला बदलायचे आहे. आम्हाला नवीन नेता मिळावा, यासाठी आम्ही शरद पवार यांच्याकडे साकडे घातले होते. त्यामुळे अजूनही त्यांनी उमेदवारीचा विचार करावा.
– भरत शहा, माजी उपनगराध्यक्ष इंदापूर नगरपरिषद.