मुंबई – अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आक्रमक झाला असून आज अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून (Cabinet) बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना दिले.
सुप्रिया सुळेंविरोधात अपशब्दांचा वापर करून अब्दुल सत्तार यांनी खालचा स्तर जाहीर केला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे, तसेच भारताच्या संसदेच्या सदस्य असेलल्या महिलेचा अशा प्रकारे अपमान करणे, याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. अशा मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी करणारे निवेदन आम्ही राज्यपालांना दिले आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.
ही पहिली घटना नाही. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना चहाऐवजी दारु पिता का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. अनेकवेळा त्यांनी अशा प्रकारे विधाने केली आहेत. मंत्रिमंडळातील सदस्यांनी काही मर्यादा सांभाळाव्या लागतात. मात्र, त्याचे वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी राज्यापालांकडे केली आह, असे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ताबडतोब याबाबतीत निर्णय घेतला पाहिजे. राज्यात अशा प्रकारे भाषा वापरण्याची पद्धत नाही. राज्याची एक राजकीय संस्कृती आहे. आपण कितीही एकमेकांचे विरोधक असलो, तरीही भाषेची मर्यादा नेहमीच सर्वांनी सांभाळली. आपण कोणाचा अरे-तुरे असा एकेरी उल्लेखही करत नाही, अशा परंपरेला छेद देण्याचे काम सत्तार यांनी केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.