फोटो सौजन्य - Social Media
कल्याणमध्ये घडलेल्या मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्यांमध्ये खळबळ उडवली आहे. ठाण्यातील हिरानंदानी स्टेट येथील पलासिया बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर दाम्पत्य डॉ. प्रसाद साळी आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी रुग्णालय सुरू करण्याचे आमिष दाखवत तब्बल सत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मे 2024 मध्ये घडलेल्या या घटनेत त्यांनी कल्याण आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये पन्नास खाटांचे आधुनिक रुग्णालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
या रुग्णालयात मेडिकल स्टोअर चालविण्याची संधी मिळेल, असे सांगून त्यांनी डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा सौरभ कांबळे यांच्याकडून चेकद्वारे तब्बल सत्तर लाख रुपये घेतले. यासाठी करारनाम्यावर स्वाक्षरीदेखील करण्यात आली होती, मात्र वर्ष उलटून गेले तरी रुग्णालय सुरू झाले नाही आणि रक्कमही परत करण्यात आली नाही. वारंवार चौकशी केली असता आरोपी दाम्पत्याने टाळाटाळ केली. शेवटी पीडितांनी पोलिसांत धाव घेतली आणि कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्यात या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस तपासात या प्रकरणात आणखी काही डॉक्टर, फार्मासिस्ट किंवा पॅथॉलॉजी व्यवसायिकांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपी दाम्पत्य सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे विश्वासाचा गैरवापर करून वैद्यकीय क्षेत्रातील काही व्यक्तींनी लोकांची फसवणूक केल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. आरोग्यसेवा ही विश्वासावर आधारलेली सेवा मानली जाते, परंतु पैशासाठी या विश्वासाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात समाजात संतापाची लाट उसळली आहे.
अनेकांनी या घटनेबद्दल कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली असून अशा गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. ही घटना वैद्यकीय क्षेत्रात एक काळी छाया टाकणारी ठरत असून पुढील काळात अशा फसवणुकीपासून सावध राहणे किती आवश्यक आहे, हेही अधोरेखित करत आहे.