करडी : मोहाडी तालुका वैनगंगा नदीमुळे दोन भागात विभाजीत आहे. पूर्वेकडील करडी, मुंढरी परिसरातील २६ गावाची महसूल यंत्रणा केवळ ४ तलाठी व २ कोतवाल यांच्या खांद्यावर आहे. नानाविध कामांचा डोलारा यामुळे जनतेची कामे वेळेवर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तातडीने तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
३० वर्षांपूर्वी प्रत्येक गावाकरिता तलाठ्याच्या मदतीकरिता १ कोतवाल असायचा. वैनगंगेच्या पूर्वकडील २६ गावात देव्हाडा बुज, मोहगाव, करडी, मुंढरी, पालोरा व जांभोरा अशी ६ तलाठी साझे कार्यरत होती. ६ तलाठी व ६ कोतवाल कार्यरत होते. दीड वर्षा अगोदर नव्याने तलाठी साझ्याची निर्मिती करण्यात आली. यात बदल होवून देव्हाडा साझ्यातील निलज बुज व मोहगाव साइयातील निलज खुर्द, मुंढरी खुर्द अशी तीन गावे मिळून नव्याने निलज बुज साझा तयार झाला. मुंढरी बुज साझ्यातील डोंगरदेव व पालोरा साझ्यातील बोंडे व खडकी, अशी तीन गावे मिळून खडकी साझा तयार झाला. तर, मुंढरी बुज साझ्यातील ढिवरवाडा, पालोरा साझ्यातील बोरगाव व जांभोरा साझ्यातील पांजरा, बोरी अशी ४ गावे मिळून नव्याने पांजरा साझा तयार झाला. ६ साइयांचे ९ झाले. पण, कर्मचारी बाढले नाहीत, उलट कमी झाले. ६ पैकी २ तलाठ्याची बदली झाली, नवे कुणी आले नाही आणि कधी येतील यांची शाश्वती नाही. सर्वसामान्यांची कामे वेळेवर होत नसल्याने आर्थिक व मानसिक झळ सोसावी लागत आहे.
देव्हाडाचे तलाठी पंकज घोडस्वार याचेकडे निलज बुज साझ्याच्या अतिरिक्त प्रभारात एकूण गावे ६ गावे आहेत. मोहगावचे तलाठी अमृते यांचे करडीच्या अतिरक्त प्रभारातील ६ गावे, पालोराचे तलाठी निखिल गजभीये यांचेकडे खडकी व मुंढरी बुज साझ्यातील अतिरिक्त प्रभारात ७ गावे तर जांभोराचे तलाठी वसंत कांबळे यांचेकडे पांजरा साझ्यातील ८ गावे अतिरिक्त आहेत. तलाठी घोडेस्वार यांचे मदतीला ६ गावांसाठी कोतवाल भारत रोडगे, तलाठी कांबळे यांचेकडे ८ गावांसाठी कोतवाल अनिल वैद्य तर, तलाठी अमृते व गजभीये यांचेकडे कोतवाल नाहीत.
कार्यालय, रेतीघाट आणि तहसीलच्या चकरा
तलाठी कार्यालयात रोज बसला तर जनतेची कामे होतील. पण, आता हे चित्र दिसत नाही. तलाठी, कोतवाल यांना रेती घाट, फिरते पथक आणि शासनाचा वेळोवेळी माहिती देण्यासाठी तहसीलला बोलविले जाते. तलाठयांचा सर्वाधिक वेळ कार्यालय बाहेर जात असल्याने जनतेची कामे रखडली जात आहेत.
धावपळीत पिसले जाताहेत कोतवाल
२६ गावात ९ सांझे आणि ४ तलाठी असले तरी फक्त दोन कोतवाल कार्यरत आहेत. तलाठी बाहेर गेल्यास कार्यालयात बसणाऱ्या कोतवालांना नागरिकांच्या नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. आठवडयातून दोन दिवस टपालसाठी तहसील, फिरते पथकांसोबत रेती घाट आणि दररोज कार्यालय बसावे लागते. परंतु, पगार मात्र, तुटपुंजा. परिणामी एक ना धड भाराभर चिंध्या, अशी अवस्था या कोतवालांची झाली आहे. त्यातही तलाठी व मोठे अधिकारी नेहमीच कोतवालांनाच धारेवर धरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तलाठी व कोतवालांची पद भरती तातडीने करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कामाचा ताण आणि आक्रोशित नागरिक
शासनाच्या अनेक योजना व माहिती, आधार, निराधार, तसेच प्रत्येक योजना तलाठी कार्यालयाशी निगडीत आहे. त्यातच आठवड्यातून २ – ३ दिवस तहसीलला, सध्या शेतकऱ्यांना कर्जासाठी सातबारा, आठ व विविध दाखल्याची गरज असल्याने गर्दी होत आहे. पण, तलाठी तहसीलला गेले, आता येतील, नंतर येतील म्हणून ठक लावून लावल्याशिवाय नागरिकांकडे पर्याय राहत नाही.