महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली 'ही' मोठी जबाबदारी; आता ओडिशात... (संग्रहित फोटो)
मुंबई : चार वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशच्या गोरखपूर क्षेत्राची जबाबदारी सांभाळणारे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपने ओडिशातील राज्यसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे पक्षाने जाहीर केले.
प्रदेशाध्यक्ष असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत विक्रमी जागा निवडून आणल्या. सद्यस्थितीत राज्यात ते भाजपचे क्रमांक २ चे नेते गणले जातात. पक्षाने आता १६ मार्चला होणाऱ्या निवडणुकीसाठी ओडिशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. एक प्रभावी चेहरा म्हणून बावनकुळे यांच्याकडे बघितले जाते. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले होते. त्यामुळे त्यांचा संघटना व सरकारमध्ये दबदबा वाढला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांनी घवघवीत यश मिळवले.
दरम्यान, या निवडीनंतर बावनकुळे यांनी पंतप्रधानांसह अनेकांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व शिस्त पाळत पार पाडू, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी दाखल झालेल्या अर्जामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 7 जागांसाठी नेमके सातच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज राहिलेली नाही. बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी आहे.
हेदेखील वाचा : Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा
विनोद तावडेंनाही राज्यसभेसाठी संधी
भाजपकडून 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. तर शिवसेना (शिंदे गट) कडून ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना विशेष परिस्थितीही पाहायला मिळाली. तब्येतीच्या कारणामुळे शरद पवार स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.






