File Photo : Thackeray-Congress
सांगली : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. असे असताना आता आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून पुन्हा विश्वासघात होईल, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी काँग्रेससोबत आघाडी करू नये, अशी भूमिका घेतली आहे.
सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच्या काँग्रेसच्या वादावर पडदा पडला आहे, असे वाटत असतानाच नव्याने वाद उद्भवण्याची दाट शक्यता आहे. यावरून लोकसभेनंतर विधानसभेलाही सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापणार असल्याचे दिसत आहे. सांगलीचे अपक्ष खासदार आणि काँग्रेसचे सहयोगी सदस्य विशाल पाटील यांनीच तसे स्पष्ट संकेत खासदार दिले आहेत, असा विभुते यांचा दावा आहे.
शिंदे गटाच्या उमेदवाराला पाटील यांचा पाठिंबा
खानापूर-विटा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना खासदार विशाल पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट त्यांच्याविरोधात उमेदवार देणार आहे. ठाकरे गटाचा उमेदवार महाविकास आघाडीचा असणार आहे, असे असताना विशाल पाटील यांनी विरोधी उमेदवाराला पाठिंबा देण्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.
बाबर यांनी केली विशाल पाटलांना मदत
सुहास बाबर यांनी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना मदत केली होती. ही बाब आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे संजय विभुते यांनी सांगितले. यावरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अन् ठाकरे गटामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.