फोटो सौजन्य - Social Media
सिंचन यंत्रणांची दुरुस्ती व देखभाल, पिकांचे परिभ्रमण, दुहंगामी व उन्हाळी पिकांची तयारी, तसेच उपलब्ध पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आवर्तन सुरू झाल्यानंतर पिकांचे व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, रोगराई नियंत्रण आणि आवश्यक तांत्रिक मदत तातडीने उपलब्ध करण्यासाठी विभागांनी सज्ज राहण्याचे आदेश दिले. अतिवृष्टी, अल्पवृष्टी किंवा हवामानातील बदल यांचा परिणाम सर्वाधिक शेतीवर होत असल्याने पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि वेळेवर दिलेले मार्गदर्शन यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र जाधव, कारंजा येथील कार्यकारी अभियंता जेवळीकर, उपकार्यकारी अभियंता निखील चव्हाण, उपविभागीय अधिकारी नमन डाखोडे, सहाय्यक अभियंता भास्कर वळवी, कृषी उपसंचालक हिना शेख, मुख्यमंत्री फेलो संकेत नरूटे, तसेच कनिष्ठ अभियंता अश्विनी राठोड आदी अधिकारी उपस्थित होते. सर्व संबंधित विभागांनी आपापल्या प्राथमिक तयारीचा आढावा सादर केला असून, आगामी काळातील कृषीविषयक नियोजनावरही चर्चा झाली. रब्बी हंगामात पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास उत्पादन घटण्याचा धोका वाढतो, त्यामुळे तांत्रिक मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांना वेळेवर माहितीपुरवठा या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासन, जलसंपदा विभाग, कृषी विभाग आणि अन्य यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास रब्बी हंगाम अधिक फलदायी ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच, उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब आणि शेतकऱ्यांच्या सहभागातून पाण्याचे संवर्धन यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच, सर्व यंत्रणांचा समन्वय आणि शेतकऱ्यांशी सातत्याने संवाद ठेवल्यास रब्बी हंगामाची उत्पादकता वाढेल आणि जिल्ह्यातील कृषी व्यवस्था अधिक सक्षम बनेल, असा आशावाद बैठकीतून व्यक्त झाला.






