Photo Credit : Team Navrashtra
पुणे: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच जेव्हा ठोकून काढण्याची भाषा करतात तेव्हा ते गृहमंत्री आहेत की ठोकमंत्री आहेत, हा प्रश्न त्यांनी एकदा स्वत:ला विचारला पाहिजे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असताना जर कुंपणच शेत खात असेल तर दाद कुणाला मागायची, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. रविवारी (21जुलै) झालेल्या भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर आज (22 जुलै) पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आरोपांना पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील अधिवेशनात ज्याप्रकारे भूमिका मांडली ते पाहता फडणवीस हेच फेक नरेटिव्हचे चालते बोलते सर्वात मोठे केंद्र असल्यासारखे वाटतात, असा पलटवारही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला.
अमित शाहांनी उद्धव ठाकरेंचा ‘औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष’ असा उल्लेख करत टीका केली होती. त्याला उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘आम्हाला अमित शाहांवर काही बोलायचेच नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत आणि काय आहोत? याचं प्रमाणपत्र गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही.’
इतकेच नव्हे तर, ‘ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग लागले आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. उद्योगपती गौतम अदानींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्यामुळे आपली आर्थिक रसद तुटेल या भितीने औरंगजेब फॅन क्लब सारखी भाषा करत आहात, यावरूनच तुमचा स्तर किती खाली गेलाय हे समजते.’ असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे.