नवी मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. खारघरमध्ये वीस ते पंचवीस लाख अनुयायी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारावेळी शाल, मानपत्र, 25 लाखांचा धनादेश आणि मानचिन्ह तसेच 10 फुटांचा गुलाबाचा हार, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना श्रीसेवकांच्या वतीनं देण्यात आला. दरम्यान, व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM), मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे आदी नेते व मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मागील पंधरा दिवसांपासून जोरदार व जय्यत तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून धर्माधिकारी यांचे लाखोंच्या संख्येनं अनुयायी खारघरमध्ये दाखल झाले होते.
मानवता हा सगळ्यात महत्त्वाचा व मोठा धर्म…
दरम्यान, पुरस्कारमूर्ती आप्पासाहेब धर्माधिकारी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातल्या भाग्याचा क्षण आहे. कुठलाही पुरस्कार मोठाच असतो. हा कार्याचा गौरव आहे. नानासाहेबांनी जे कष्ट केले. श्री सदस्यांनी जे कष्ट केले, करतायेत, त्यांना याचं श्रेय जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देणं, एका घरात दुसऱ्यांदा देणं हे पहिल्यांदाच होतंय. हे महान कौतुक आहे. खेड्यांतून काम सुरु केलं. त्यामुळं या कामाची प्रसिद्धी कधी केली नाही. प्रसिद्धीमुळे काही मिळत नाही. मानवता हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे. त्यासाठीच हा सगळाच खटाटोप आहे. अखेरच्या श्वासापर्यंत नानासाहेबांप्रमाणेच काम करेन, सचिनही उत्तराधिकारी म्हणून काम करत राहणार आहे. काम हे श्रेष्ठ आहे. काम जेव्हा उत्तम होतं, तेव्हा कौतुक होतं. कार्य श्रेष्ठ आहे म्हणून देहाचा सन्मान होतो. हा नानांना आणि तुम्हाला पुरस्कार अर्पण करतो, असं आप्पासाहेब म्हणाले.
शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार
समाजाचे, देशाचे ऋण आपल्यावर आहेत. आई-वडिलांचे ऋण आपल्यावर आहेत. त्यांच्यासाठी आपण काय करतो, हा प्रश्न आहे. प्रत्येकानं उभं राहून ही सेवा करायला हवी. केवळ बोलून होत नाही. पुढाऱ्यांची देशसेवा, समाजाची आणि लोकांची सेवा ते करतात. ही समाजाची सेवाच आहे. समाजसेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. प्रतिष्ठान विविध कामं करते. वृक्षारोपणानं आयुष्य आनंद जगण्याची ऊर्जा मिळते. त्यासाठी रोपण केलं पाहिजे. वृक्ष लावणं सोपं आहे. या पावसाळ्यात सुद्धा वृक्षारोपण करायचा आहे. पावसाळ्यात एकेका माणसानं ५ झाडं लावावीत, ती वाढवावीत. लहान मुलांप्रमाणे वृक्षांची जोपासना करावी. वृक्षांचे मोठे कार्य आहे. देशात सगळ्यांनी आनंदी जगावं यासाठी आरोग्य शिबीरं घेतो. त्यात अनेकांना मार्गदर्शन करतो. त्यासाठी प्रयत्न करतोय. करत राहणार, रक्तदान हे मोठं कार्य आहे. ज्याला आवश्यकता आहे त्याला दिलं तर कुणाचे तरी प्राण वाचतील. रक्तदानासाठी प्रत्येकानं झटावं लागेल. समाजानं सर्व प्रकारांनी सेवा केली तर देशाचा फायदा होईल. मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करत राहणार असल्याचं आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले.