विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चातून शासनाला इशारा
सासवड: आम्हाला विश्वासात न घेता शासन आमच्या गावात विमानतळ प्रकल्पाचा घाट घालीत आहे. आम्ही याविरोधात दहा वर्षे कडाडून विरोध करीत आलो आहे. इंग्रजांचा कायदा लोक वस्ती पुनर्वसन करण्याचा आहे, मात्र सध्याचे लोकांना विस्थापित करीत आहे. प्रकल्पामुळे आमची हजारो एकर जमीन जाणार असून माणसांसह जनावरे, प्राणी, पशु, पक्षी सर्वच विस्थापित होत आहे. आमच्या नावाखाली प्रकल्प करणार आणि आम्हीच विस्थापित होणार असेल तर प्रकल्प कोणासाठी करताय ? आम्ही जायचे कोठे ? असे प्रश्न उपस्थित करून शासनाने जबरदस्ती केली तरी एक एकर सुद्धा जमीन देणार नाही,असा थेट इशारा शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सप्टेंबर पर्यंत पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची जागा संपादित करण्याचे आदेश दिले असून त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामळे प्रकल्पबाधित शेतकरी पीएस मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी नगरपालिका पासून तहसील कार्यालयापर्यंत हातात काळे झेंडे घेत मोर्चा काढून शासनाचा जोरदार निषेध केला. पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देवून आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोच कराव्यात असे आवाहन करण्यात आले.
यावेळी वनपुरी सरपंच राजश्री कुंभारकर, कुंभारवळण सरपंच मंजुषा गायकवाड, एखतपूर मुंजवडी सरपंच शीतल टिळेकर, पारगाव सरपंच ज्योती मेमाणे, उदाचीवादी सरपंच सविता मगर, खानवडी सरपंच स्वप्नाली होले त्याचप्रमाणे महादेव टिळेकर, देविदास कामथे, बापू मेमाणे, संतोष हगवणे, नामदेव कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर, रामदास होले, अमोल कामठे, रवींद्र फुले, रामदास कुंभारकर, तात्या मगर, ऍड. शिवाजी कोलते, माऊली मेमाणे, गणेश मेमाणे यांच्यासह विविध गावांचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही लोक प्रतिनिधी म्हणतात शासनाने रेट जाहीर केल्यावर लोक जमीन देण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. अशा शब्दात नाव न घेता आमदार विजय शिवतारे यांच्याकडे अंगुली निर्देश करीत शेती हा शेवटचा पर्याय आहे. ती टिकवून राहिली पाहिजे. शेतकऱ्यांची संमती नसेल तर प्रकल्प होणार नाही. त्यामुळे कोणीही सही करू नये असे आवाहन पीएस मेमाणे यांनी केले आहे.
शासनाने शेतीसाठी पुरंदर उपसा योजनेतून पाणी आणले. त्या जोरावर आम्ही शेतात फळबागा लावल्या, उसाचे उत्पादन घेतोय, आम्ही मोठाली घरे बांधली, शेतीवाडी तयार केली या सर्वांवर नांगर फिरविणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही.आम्हाला विस्थापित करून कोणासाठी प्रकल्प आणताय ? असा प्रश्न एखतपूर मुंजवडी च्या सरपंच शीतल टिळेकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: Maharashtra Election 2024: “शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन…”; नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांचे विधान
शेतकऱ्यांनी एकजूट ठेवावी. आम्ही आंदोलनासाठी परवानगी मागत असताना आम्हाला दिली जात नाही आणि तरीही एवढी लोक जमत असताना परवानगी मिळाल्यास किती लोक येतील याचा शासनाने विचार करावा. असा इशारा देत जमीनच राहणार नसेल तर भविष्यात खाणार काय ? त्यामुळे याबाबत शासनाने आमच्या सोबत राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तर शेतकऱ्यांचा विरोध असताना शासन विमानतळ प्रकपाचा घाट का घालीत आहे ? तुम्ही कितीही जोर लावा आम्ही मागे हटणार नाही. यापुढे आम्ही जोरदार संघर्ष करू पण विमानतळ नको ही एकच आमची मागणी आहे. असे खानवडीचे माजी सरपंच रामदास होले यांनी ठणकावून सांगितले.
विमानतळ प्रकल्पाला विरोध केला म्हणून आम्हाला अटक झाली आहे असे सांगून शेवटपर्यंत विरोध करीत राहणार असे महादेव टिळेकर, संतोष हगवणे यांनी सांगितले. पारगावच्या सरपंच ज्योती मेमाणे, वनपुरीच्या सरपंच राजश्री कुंभारकर, उदाचीवाडी सरपंच सविता मगर तसेच सुनील धिवार, बापू मेमाणे, माऊली मेमाणे, ॲड शिवाजी कोलते यांनीही शासनाचा जोरदार निषेध केला आहे.