दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत 'तो' अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर (Photo Credit- Social Media)
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, डिपॉझिट न भरल्याने त्या गर्भवती महिलेला उपचार मिळाले नाहीत आणि त्या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप आहे. संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. आता ससून जनरल रुग्णालयाच्या समितीने तयार केलेला अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे.
गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्यावर उपचार केले नसल्याचा आरोप आहे. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची धर्मादाय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीने चौकशी केली. रुग्णालयाकडे सुमारे 35 कोटी 48 लाख रुपये शिल्लक आहेत, ही धक्कादायक माहिती चौकशी अहवालात ही समोर आले आहे. या अनुषंगाने अनेक रुग्णालये धर्मादाय असूनही त्याची माहिती देत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना मदत मिळत नाही, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकालाही चांगले उपचार मिळावे, यासाठी असलेला धर्मादाय रुग्णालयाचा हेतूच साध्य होत नाही. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे ‘धर्मादाय’ असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा. त्यानुसार, असलेल्या सुविधा, नियमावली यांची माहितीही लावावी, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असा नियम आहे. मात्र, अनेक रुग्णालये त्याची अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांचे ऑडिट करावे, अशी मागणी होत आहे.
पोलिस संरक्षणाची मागणी
तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर डॉक्टर घैसास यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात जमावबंदी
गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलने झाली. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी या परिसरात जमावबंदीचे आदेशही काढले होते.
करमाफीसाठी रुग्णालयाचा प्रताप
पुण्यात केवळ दीनानाथ मंगेशकर या एकमेव रूग्णालयाकडून रूग्णभरतीच्यावेळी अनामत रक्कम घेतली जात नाही, असा दावा करत रूग्णालय विश्वस्तांनी, राज्य सरकारकडून लाखो रूपयांचा बिनशेती (अकृषिक) कर माफ करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने, महापालिकेचा कोट्यवधी रूपयांचा मिळकतकरही भरलेला नाही, त्यापाठोपाठ हा प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.