मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये अर्थात फिल्म सिटीमध्ये (Dadasaheb Phalke Film City) भीषण आग लागली आहे. फिल्म सिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटवर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर काही कलाकार सेटवर अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.संध्याकाळी 4 वाजता ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सेटवर फायर सेफ्टीची कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. जेव्हा आग लागली तेव्हा लहान मुलांच्या सीनचं शूटिंग सुरु होतं.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेच्या सेटला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या पोहोचल्या आहेत. शूटिंगच्या वेळी साधारण हजार माणसे सेटवर होती.
दादासाहेब फाळके चित्रनगरीतील ‘गुम है किसी के प्यार मे’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कलाकार, तंत्रज्ञ यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
All Indian Cine Workers Association चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रोड्युसर, चॅनल आणि प्रॉडक्शन हाऊस वर FIR दाखल करण्यात यावा. तसेच फिल्म सिटीच्या मॅनेजिंग डायरेक्टरवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
सुरेश गुप्ता यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या घटनेच्या तपासाची मागणी केली आहे. तसेच प्रोड्युसर, प्रॉडक्शन हाउस आणि चॅनलवर मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. फिल्म सिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांचा राजीनामा घेण्यात यावा कारण फायर सेफ्टीशिवाय फिल्म सिटीमध्ये अनेक ठिकाणी शूटिंग सुरु आहे. कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या जीवाला धोका आहे. यावर ठोस कारवाई न झाल्यास AICWA महाराष्ट्र विधानसभेला घेराव घालेल, असा इशारा देण्यात आला आहे.






