संग्रहित फोटो
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण थंडीच्या दिवसात तापले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित यावेत अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र त्यास विराेध केला हाेता. तर एकत्र येण्याची भुमिका मांडत ज्येष्ठ नगरसेवक विशाल तांबे यांनी राजकीय सन्यासच घेण्याचा निर्णय जाहीर केला हाेता. एकीकडे पक्षातंर्गत वाद सुरु असतानाच वरीष्ठ नेत्यांनी एकत्र येण्याची संमती दाखविली. तसेच अजित पवार यांच्याकडूनही काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविला गेला हाेता. त्यामुळे पुण्यात आघाडी कसे डाव खेळणार याकडे लक्ष लागले आहे.
मंगळवारी राजकीय घडामाेडींना वेग आला. शरद पवार यांच्या गटाकडून वंदना चव्हाण, अंकुश काकडे आणि विशाल तांबे, तर अजित पवार गटाकडून आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुभाष जगताप यांनी चर्चा केली. या चर्चेत दाेन्ही गटांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याची बातमी शहरात पसरली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाली हाेती. तर मी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी मुंबईला आलाे असल्याचे जगताप यांनी साेशल मिडीयाच्या माध्यमातून स्पष्ट केले. त्यांनी राजीनामा दिला आहे की नाही, याबाबत अधिकृत माहीती पक्षाकडून दिली गेली नाही.
महाविकास आघाडीला बळ!
पुणे महापालिकेत मागील निवडणुकीत भाजप पाठाेपाठ राष्ट्रवादी काॅंग्रेसचे संख्याबळ हाेते. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विभाजनानंतर दाेन गट पडले. विधानसभा निवडणुकीत दाेन्ही पक्षाचे प्रत्येकी एक आमदार निवडून आले आहेत. महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांप्रमाणे दाेन्ही पक्षांकडे निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची संख्या तुलनेत कमी आहे. या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष सहभागी झाला तर त्याचा फायदा निश्चितच आघाडीला हाेऊ शकताे.
आता जागा वाटपांकडे लक्ष
विधानसभा निवडणुकीपासून काॅंग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हे पुण्यात हातात हात घालून काम करीत आहेत. महाविकास आघाडी म्हणून ते निवडणुकीला सामाेरे जाणार हाेते. आता दाेन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र आले आहेत, तसेच ठाकरे बंधूही एकत्र आले आहेत. यामुळे जागा वाटपाचा मुद्दा हा महत्वाचा ठरणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दाेन दिवसांत जागा वाटपाचे गणित सुटेल असा दावा आघाडीचे नेते करीत आहेत.






