मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली! (Photo Credit- X)
मोनोरेल बंद असण्याचे कारण काय?
चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकचे संचलन-देखभालीची जबाबदारी याआधी एल अँड टी-स्कोमी कन्सोर्टियम कंपनीकडे होती. मात्र या कंपनीकडून योग्यप्रकारे संचलन-देखभाल होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. मोनोरेलच्या डब्याला २०१७ मध्ये भीषण आग लागली आणि मोनोरेल काही महिने बंद ठेवावी लागली. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने २०१८ मध्ये एल अँड टी-स्कोमी कन्सोर्टियम यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली आणि एमएमएमओसीएलकडे सोपवली.
तर दुसरीकडे मोनोरेल मार्गिकेवर सातत्याने अपघात होत आहेत. याच अपघाताच्या अनुषंगाने होणाऱ्या टीकेनंतर २० सप्टेंबर २०२५ पासून मोनोरेल मार्गिका अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. सध्या मोनोरेल गाड्यांचे, विविध यंत्रणेचे अत्याधुनिकीकरण केले जात आहे. दरम्यान, मोनोरेल मार्गिका बंद करण्याआधीच एमएमएमओसीएलने मोनोरेलच्या संचलन देखभालीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आणि निविदा मागविल्या होत्या.
आचारसंहितेचा प्रक्रीया ढकलली पुढे
या निविदेला आतापर्यंत चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये अदानी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडवेल कन्स्ट्रक्शन आणि पॉवर मेक प्रोजेक्ट्स अशा या चार कंपन्यांचा त्यात समावेश आहे. या निविदांची छाननी करून आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार होत्या, मात्र आता आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. ही निविदा २९७ कोटी रुपयांची आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून मोनोरेल नवीन वर्षात एप्रिलमध्ये सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. मात्र आता आचार संहितेचा खोडा आल्याने ही प्रक्रिया पुढे गेली असून मोनोरेल सुरू करण्यासाठी आणखी विलंब होणार आहे.






