सौजन्य - सोशल मिडीया
इंदापूर : आगामी विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे,असा आग्रह जनतेचा आहे. त्याचबरोबर कोणतं चिन्ह घ्यायचं, याबाबतही जनतेच्या भावना तीव्र आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे. त्यामुळे पितृ पंधरवडा संपताच आपण निर्णय घेऊ, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेतील, असे संकेत आहेत.
वडापुरी (ता. इंदापूर) येथे वडापुरी-काटी जिल्हा परिषद गटात नुकतेच कार्यकर्ता सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांना पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या.
पाटील म्हणाले, जनतेच्या आग्रहावर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. मात्र जबाबदारी हर्षवर्धन पाटलांची राहणार नाही. तर ज्या जनतेने आग्रह धरलेला आहे, त्या जनतेची राहणार आहे. फक्त टाळ्या वाजवू नका, जबाबदारी घेणार आहात का? असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थितांना सवाल केला. यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी हात वर करून जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी `राम कृष्ण हरी वाजवा तुतारी` अशा घोषणा मोठ-मोठ्याने देण्यात आल्या.
निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली
निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली असल्याचे चित्र सध्या तालुक्यामध्ये आहे. जिथे जनता ठरवेल, तिथे पुढाऱ्याचे काय खरे नसते. त्यामुळे गावा-गावाने उद्या काय करायचे ते ठरवले आहे. काळ कसा बदलतोय ते पहा. गेल्या दहा वर्षात आपली जी पीछेहाट, नुकसान आणि जो अन्याय झालेला आहे. या सर्वांवरती मार्ग आपल्याला शांतपणे उद्याच्या विधानसभेला मतदानाच्या माध्यमातून काढावा लागेल, असे आवाहन याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
इंदापूरमध्ये ‘तुतारी’च्या उमेदवारीवरून वातावरण तापले
हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवावी, अशी तीव्र मागणी पाटील समर्थक करत असताना. दुसरीकडे मात्र शरद पवार गटात असणारे नेते कार्यकर्ते हे `नको आजी, नको माजी`इंदापूर तालुक्याला हवाय `नवीन बाजी` अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इच्छुक असणारे आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने,ॲड. तेजसिंह पाटील,सागर मिसाळ, अमोल भिसे, अशोक घोगरे यांच्यासह भरत शहा,ॲड. राहुल मखरे, महारुद्र पाटील, दशरथ माने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रविवारी गोविंद बाग गाठत आयात उमेदवार नको, तर निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्या, अशी मागणी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी मिळविण्याकरिता मोठी रस्सीखेच सुरू असून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.