गडचिरोली : अहेरीवरून गडचिरोलीकडे येत असताना चामोर्शी मार्गावरील तळोधी ते कुरूडच्यामध्ये असलेल्या पुलाजवळ भरधाव कार रस्त्याखाली उलटल्याने चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारच्या रात्री घडली. अपघातात हॉटेल वैभवचे संचालक आणि प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे सचिव अजिझ नाथानी गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, बंडू शनिवारे, इकबाल बुधवानी हे किरकोळ जखमी झाले.
अजिझ नाथानी यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी त्यांना बरीच दुखापत झाली आहे. नाथानी यांच्या कारमध्ये हे चौघे जण होते. चामोर्शीवरून गडचिरोलीकडे निघाल्यानंतर तळोधी ते कुरूडच्या मध्ये असलेल्या नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने नाथानी यांना रस्त्याचा अंदाज आला नाही. वळण घेताना कार रस्त्याखाली उतरली. कारने चार पलट्या घेतल्या.
चामोर्शी तालुका शिवसेना प्रमुख पप्पी पठाण यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. त्यानंतर नाथानी यांना नागपूरला हलविण्यात आले. उर्वरित तिघांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.