सौजन्य - नवराष्ट्र टीम
इंदापूर : इंदापूरमध्ये शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल बारा तास चालली. सकाळी मानाच्या श्री सिद्धेश्वर मंदिर गणपतीची महाआरती राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, शहा ग्लोबल चे सर्वेसर्वा मुकुंद शहा, प्रा. कृष्णा ताटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, धनंजय बाब्रस, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
मानाच्या पहिल्या श्री सिद्धेश्वर गणपतीच्या मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ठळकपणे जाणवला. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी टाळ-भगवे झेंडे हातात घेत गणरायांच्या गाण्यांवर नृत्य सादर केले. भक्तिरस आणि उत्साहाच्या संगमाने मिरवणुकीला वेगळीच उंची मिळाली. त्यानंतर मानाचा दुसरा गणपती कासार पट्टा येथील श्री नरसिंह मित्र मंडळ व मानाचा तिसरा गणपती श्री नेहरू मित्र मंडळ यांच्या मिरवणुका उत्साहात निघाल्या.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही मिरवणुकीत उत्साहात सहभाग नोंदवला. त्यांनी चिमुकल्यांसोबत मनमुराद नृत्य करून आनंद लुटला. तसेच अनेक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनापूर्वी झालेल्या महाआरत्यांमध्येही ते सहभागी झाले. सावता माळी नगर, नेताजी मित्र मंडळ, राजेवली मित्र मंडळ, श्रीमंत शिवराज प्रतिष्ठान, अखिल मंडई मित्र मंडळ, नवयुवक मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, जागृती मित्र मंडळ, नवजवान मित्र मंडळ, बाजारतळ रविवार पेठ, महाकाल मित्र मंडळ, अंबिका नगर आदी मंडळांच्या आकर्षक सजावट विशेष लक्षवेधी ठरल्या.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या संकल्पनेतून शंभर फुटी रोडवर कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन करणाऱ्या मंडळांना नगरपरिषदेच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून निर्माल्य संकलनाची प्रभावी उपाययोजना राबवण्यात आली.
कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीदरम्यान किरकोळ वाद-विवाद वगळता संपूर्ण मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. नेहरू चौकात इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे कृष्णा ताटे, हमीद अतार, अविनाश कोथमीरे, शेखर पाटील, महादेव चव्हाण, फकीर पठाण, ॲड. इनायतअली काझी, संतोष देवकर, दादा पिसे, संदीपान कडवळे, उमेश मखरे, अजीज बागवान, अफसर मोमीन, मुशीर पठाण, सचिन पलंगे, सागर गानबोटे, अनिल पवार, कुणाल खडके, पांडुरंग व्यवहारे, संतोष जामदार यांनी शहरातील मंडळ प्रमुखांचा सन्मान करून गौरव केला. तसेच नेहरू चौक येथे इंदापूर नगर परिषदेच्या वतीने आणि महसूल विभागाच्या वतीने मिरवणुकीत सहभागी प्रत्येक मंडळाचा सन्मान करण्यात आला.