पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा..
Ganpatipule Temple: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिर हे अरबी समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले एक स्वयंभू देवस्थान आहे. गणपती मंदिर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अष्टविनायकांप्रमाणे हे देवस्थान स्वयंभू आणि जागृत म्हणून प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील पश्चिमद्वार देवता म्हणूनही ओळखले जाते. पश्चिमेकडे असणारा अथांग समुद्र व पूर्वेकडे हिरव्या गर्द डोंगराच्या पायथ्याशी निसर्गसमृद्ध परिसरात हे देवस्थान स्थित आहे, म्हणून या मंदिराला भेट देण्यासाठी भाविकांती प्रचंड गर्दी असते. तुम्ही पण गणपतीपुळेच्या मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या…
कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी आता वस्त्रसंहिता अर्थात ‘ड्रेस कोड’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची येत्या 1 जानेवारीपासून कडक आणि काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन
मंदिराचे पावित्र्य आणि धार्मिक स्थळाची मर्यादा लक्षात घेऊन दर्शनासाठी येताना योग्य पेहराव करण्याचे आवाहन यापूर्वीपासूनच करण्यात येत होते. मंदिर परिसरात वस्त्रसंहितेबाबत जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले होते. मात्र, आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ही वस्त्रसंहिता सक्तीची करण्यात येणार असल्याचे संस्थानाने स्पष्ट केले आहे.
गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ असण्याबरोबरच लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी येणारे अनेक पर्यटक मंदिरातही दर्शनासाठी जातात. मात्र, समुद्रकिनाऱ्यासाठी वापरला जाणारा तोकडा पेहराव किंवा ‘ट्रिप मूड’मधील कमी कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करता येणार नाही.
गुडघ्यांच्या वर असणारे स्कर्ट्स किंवा ड्रेस तसेच असभ्य भाषा, आक्षेपार्ह मजकूर अथवा चित्रे छापलेले कपडे घालून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येताना धार्मिक स्थळाला साजेसा आणि सभ्य पेहराव करणे आवश्यक असणार आहे.
मंदिर प्रशासनाने या वस्त्रसंहितेत लहान मुलांसाठी विशेष सवलत ठेवली आहे. दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ड्रेस कोडच्या नियमातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वस्त्रसंहितेची सक्ती असणार नाही.
गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने यापूर्वी जनजागृतीच्या माध्यमातून भाविकांना योग्य पेहराव करण्याचे आवाहन केले होते. आता मात्र 1 जानेवारीपासून नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार असल्याने गणपतीपुळेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना नव्या वस्त्रसंहितेची काळजी घ्यावी लागणार आहे.
Ratnagiri: ‘…अन्यथा नगरपरिषदेवर गुन्हा दाखल करू’; भटक्या श्वानांवरून रत्नागिरीत वातावरण तापले






