सौजन्य - नवराष्ट्र टीम
माळेगाव : माझी वसुंधरा अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या माळेगाव नगरपंचायतीने आपल्या लौकिकास साजेसे काम करत संत सोपानकाका पालखी मार्गस्थ होताच दोन तासांत सहा टन कचरा गोळा करून शहर चकाचक केले. कचरा गोळा करण्यासाठी एन. डी. के मक्तेदार कडूनही मदत करण्यात आली.
वैष्णवभक्तांना अन्नदानासह अल्पोपहार
संत सोपानकाका पालखी सोहळा मंगळवारी माळेगाव मुक्कामी होता. यावेळी स्वयंसेवी संस्था व इतरांनी वैष्णवभक्तांना अन्नदानासह अल्पोपहार वाटला. यावेळी जेवणासाठी वापरण्यात आलेल्या पत्रावळी, पेपर डिश, प्लास्टिक ग्लास, चहाचे ग्लास, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक कागद, देवासाठी वापरलेले हार, फुले आदींसह खेळण्यांचे कागद व बैलांची वैरण असा कचरा साठला होता. दुसऱ्या दिवशीही तोच कचरा व पालखी सजावटीनंतर झालेला कचरा मोठ्या प्रमाणात सर्वत्र साचला होता.
पालखी बारामतीकडे मार्गस्थ होताच अवघ्या दोन तासांत नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी व ठेकेदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचा परिसर चकाचक केला. स्वच्छता विभाग सुपरवायझर सुरेश सावंत, मुकादम संजय रिटे, एन.डी.के.मुकादम महेश पवार यांनी याचे नियोजन केले होते. विविध शैक्षणिक संस्था यामार्फत नीरा-बारामती रस्ता, अमरसिंह कॉलनी रस्ता, मुलींची मराठी शाळा परिसरातील सर्व कचरा गोळा केला. हा कचरा नगरपंचायतीच्या स्वाधीन करून त्यांनी सामाजिक कर्तव्य पार पाडले.