'अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या'; रयत क्रांती संघटनेची मागणी (फोटो सौजन्य-X)
कराड : सातारा जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, भुईमूग, घेवडा आदी पिके काढणीला आली असतानाच गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने पिके कुजून वाया गेली आहेत. शेतात पाणी साचल्याने काढणी केलेले पीक बाहेर काढणेही अशक्य झाले आहे.
सरकारने जाहीर केलेली हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत ही तुटपुंजी असून, त्यातून बियाण्यांचा खर्चही भागत नाही, अशी नाराजी शेतकऱ्यांत आहे. सोयाबीनसारख्या पिकासाठी शेतकऱ्यांना एकरी सरासरी २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे सरकारने तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले. गावोगावी शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तसेच अनेक शेतकऱ्यांनी तांत्रिक व नेटवर्कच्या अडचणीमुळे ई-पीक पाहणी केलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि ई-पीक पाहणीची अट रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष विशाल पुस्तके यांच्यासह इतर अनेकांची उपस्थिती होती.
नुकसानभरपाई दिल्यास शेतकऱ्यांची दिवाळी गोड
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अतिवृष्टीमुळे कडू होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी 50 हजार नुकसानभरपाई दिल्यासच त्यांची दिवाळी गोड होईल. अन्यथा रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला.
हेदेखील वाचा : कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप