निगडी : चिखली कर संकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना अरेरावी करून कर वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच नळ कनेक्शन तोडण्याची धमकी दिली जात आहे. अशा मुजोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना समज द्यावी, अन्यथा चिखली कर संकलन केंद्रासमोर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने दिला आहे.
याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. चिखली कर संकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांसोबत अरेरावी करून त्यांना घाबरवून कर वसूलसाठी दबाव टाकत आहेत. अशा मुजोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना यांना समज द्यावी. त्यांना करदात्या नागरिकांसोबत आदराने संवाद साधण्याच्या सूचना दयाव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. तसेचं ताम्हाने वस्ती भागात अनेक वर्ष रस्त्याची कामे झालेली नाहीत त्यामुळे तेथील करदात्यांचा रस्ते कर माफ करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
करदात्या नागरिकांसोबत आदराने वागा
तसेच नागरिकांना कर भरणा करण्यासाठी टप्पे करून देण्यात यावेत, अशी मागणी करून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कर संकलन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘करदात्या नागरिकांसोबत आदराने वागावे’ या आशयाचे फलक लावण्यात आले. यावेळी शिवसेना शहर संघटक रावसाहेब थोरात, विभागप्रमुख सतिश मरळ, उपविभागप्रमुख प्रविण पाटील, प्रभाग समन्वयक सूर्यकांत देशमुख, उपविभागप्रमुख दादा ठाकरे, शाखाप्रमुख विजय शिवपुजे, सुमंत तांबे आदी उपस्थित होते.