गोरेगाव : नगरपंचायत गोरेगाव (Nagar Panchayat Goregaon) अंतर्गत विविध विकास कामांकरिता महाराष्ट्र शासनाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी २.५ कोटीचा निधी (2.5 crore fund) उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यासाठी आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale) यांनी पाठपुरावा केला होता.
मागील अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Govt) गोरेगाव नगरपंचायतीला एकही रुपयाचा निधी मिळालेला नाही. दरम्यान, नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन होताच माजी नगराध्यक्ष इंजि. आशिष बारेवार व भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे विविध विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली. त्या अनुषंगाने काही दिवसापूर्वीच आमदार विजय राहंगडाने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन त्यांना तात्काळ गोरेगाव नगरपंचायतीसाठी निधी उपलब्ध करण्यासंदर्भात निवेदन दिले होते.
त्याचेच फलस्वरूप गोरेगाव नगरपंचायतीला विविध रस्ते, नाली, सौंदर्यकरणाच्या कामांकरिता २.५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी दिली. आता अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीच्या काळामध्ये शहराच्या रखडलेल्या विकासाला गती मिळणार आहे. मागील अडीच वर्षांमध्ये कोणताही विशेष निधी शासनाने दिलेला नसून २०१९ साली भाजप सरकारमध्ये मंजूर केलेल्या निधीची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. तरी यासमोर आपण शहराच्या विकासाकरिता नवीन प्रशासकीय इमारत, स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, क्रीडांगण मैदान, फायर स्टेशन व विविध रस्ते, नाली, सौंदर्यकरण, बगीचे या करिता शासनाकडून निधी उपलब्ध करून शहराच्या विकासाला चालना देणार असल्याचे माजी नगराध्यक्ष इंजि. आशिष बारेवार यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने अवघ्या वीस-पंचवीस दिवसांमध्येच आपली मागणी पूर्ण केल्यामुळे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, भाजपा शहर अध्यक्ष हिरालाल रहांगडाले, माजी बांधकाम सभापती देवेंद्र बिसेन, मोरेश्वर रहांगडाले, अरविंद जायस्वाल, मोरेश्वर कांबळे, अनिल राऊत, वामन वरवाडे, विकास बारेवार, अंकित रहांगडाले, विशाल पारधी, बिलकराम कटरे, महेंद्र लांजेवार यांनी आमदार विजय रहांगडाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.